स्वप्नीलने नेमबाजीत भारताला मिळवून दिले तिसरे पदक   

पॅरिस : ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारतीय नेमबाजांची कामगिरी चांगली झाली आहे. भारती नेमबाज स्वप्निल कुसाळेने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत स्वप्निलने कांस्य पदकाची कमाई केली आहे. एकूण ४५१.४ गुण मिळवत त्याने कांस्य पदकाला गवसणी घातली.
 
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंत तीन पदके मिळाली आहेत. विशेष म्हणजे ही तिन्ही पदके नेमबाजांनी पटकावली आहेत. स्वप्निल कुसाळेने  जिंकलेले कांस्य पदक सर्वार्थाने ऐतिहासिक आहे. ऑलिम्पिकमध्ये ५० मीटर थ्री पोझिशन स्पर्धेत आतापर्यंत कोणत्याही नेमबाजाला पदक जिंकता आलेले  नव्हते. पण स्वप्निलने स्वप्नवत कामगिरी करत भारतीय नेमबाजांचा पदक दुष्काळ संपवला.
 
अंतिम फेरीत नीलिंग आणि प्रोन सीरिज संपल्यानंतर २९ वर्षांच्या स्वप्निल कुसाळे ३१०.१ गुणांसह पाचव्या स्थानी होता. पण स्टँडिंगच्या दोन सीरिजमध्ये त्याने  दमदार कामगिरीसह पुनरामगन केले. या सीरिजनंतर स्वप्निल तिसऱ्या क्रमांकावर आला. त्यांनी हेच स्थान कायम राखत पदकाला गवसणी घातली. नीलिंगमध्ये नेमबाजांना गुडघ्यावर बसून लक्ष्यभेद करावा लागतो. प्रोन प्रकारात जमिनीवर झोपून निशाणा साधावा लागतो. तर स्टँडिंगमध्ये उभे राहून लक्ष्य भेदावे लागते.
 
नीलिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलने ५०.८ गुणांची कमाई केली. दुसऱ्या सीरिजमध्ये त्याने ५१.९ गुण कमावले. तर तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.६ गुण मिळवले. प्रोनच्या पहिल्या सीरिजमध्ये ५२.७, दुसऱ्या सीरिजमध्ये ५२.२ आणि तिसऱ्या सीरिजमध्ये ५१.९ गुण मिळवले. स्टँडिंगच्या पहिल्या सीरिजमध्ये स्वप्निलच्या खात्यात ५१.१, तर दुसऱ्या सीरिजमध्ये ५०.४ गुण जमा झाले. स्टँडिंगच्याच दोन सीरिजच्या जोरावर स्वप्निलने बाजी मारली.
 
कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या स्वप्निलने पात्रता फेरीत ६० शॉट्समध्ये ५९० गुण मिळवले होते. नीलिंग पोझिशनमध्ये त्यानं ९९ गुणांसह सुरुवात केली. त्यानंतर प्रोनमध्ये ९८ आणि ९९ गुण मिळवले. स्टँडिंगमध्ये ९८ आणि ९७ गुणांची कमाई करत त्याने अंतिम फेरी गाठली. आता अंतिम फेरीत कांस्य पदकाची कमाई करत स्वप्निलने स्वप्नवत कामगिरी सुरुच ठेवली आहे.

Related Articles