हिमाचल प्रदेशात ढगफुटी; चार जणांचा मृत्यू, ५० बेपत्ता   

शिमला/मंडी : हिमाचल प्रदेशात ढगफुटीच्या अनेक घटनांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ५० नागरिक बेपत्ता आहेत. येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरे, पूल आणि रस्ते वाहून गेल्याचे अधिकार्‍यांनी गुरुवारी सांगितले. 
 
राज्य आपत्कालीन विभागाने सांगितले की, कुल्लूमधील निर्मंद, सेंज आणि मलाना तसेच मंडीतील पदर भागात तर शिमला जिल्ह्यातील रामपूरमध्ये ढगफुटी झाली. शिमलाचे पोलीस अधीक्षक संजीव कुमार गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिमलातील रामपूर उपविभागातील समेज खुडमध्ये ढगफुटीमुळे दोन जणांचा मृत्यू झाला तर ३० जण बेपत्ता आहेत.शिमलाचे उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, घटनास्थळावरून दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. 
 
वाहून गेलेल्या रस्त्यांमुळे बचावकार्य आव्हानात्मक बनले आहे. मनाली-चंडीगड राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळल्याने अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स आणि होमगार्ड हे बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. मंडी जिल्ह्यातील पदर उपविभागातील तेरांगजवळील राजबन गावात बुधवारी रात्री ढगफुटीच्या दुसर्‍या घटनेत दोन जण ठार, तर आठ जण बेपत्ता झाले, तसेच दोन घरेही वाहून गेली असून अनेक घरांचे नुकसान झाले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. 
 
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंडी देवी (७५) आणि चैत्री देवी (९०) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, जखमी व्यक्तीला (२५ वर्षीय राम सिंह) वाचवण्यात यश आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. कुल्लू जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीच्या घटनेत सात जण बेपत्ता झाले आहेत. कुल्लूचे उपायुक्त तोरूल एस रवीश यांनी सांगितले की, सात जण बेपत्ता आहेत.  कुल्लू जिल्ह्यातील निर्मंद मंडळाच्या भागीपुल भागात सुमारे आठ-नऊ घरे वाहून गेली आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी सीआयएसएफ आणि विशेष होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. शिमला जिल्ह्याच्या सीमेवरील समेजमध्ये तीन जण बेपत्ता असून तीन-चार घरांचे नुकसान झाले आहे. मलाणा धरणही फुटल्याचे वृत्त समोर येत आहे. मात्र परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मलाणा-१ जलविद्युत प्रकल्पात काही नागरिक अडकले आहेत. ते जमिनीखालच्या इमारतींमध्ये असून सुरक्षित असून, एनडीआरएफ आणि होमगार्ड टीम त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहेत. 

हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी

हवामान विभागाकडून कांगडा, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस इशारा देत ’रेड अलर्ट’ जारी केला.  राज्यातील २० स्थानकांवर मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. कांगडा, चंबा, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात मुसळधार पावसासाठी ’ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. राज्यात पुढील चार-पाच दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.

गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्याशी बोलून राज्यातील ढगफुटीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. या परिस्थितीत केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन शहा यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

राज्यात १३ ठिकाणी आत्पकालीन कृती केंद्र स्थापन

या विषयावर मुख्यमंत्री सुखू यांनी तातडीची बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, बुधवारी रात्रीपासून शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ५० जण बेपत्ता असून, मनालीचा  संपर्क तुटला आहे. आपत्ती निरीक्षणासाठी राज्यात १३ ठिकाणी राज्य आत्पकालीन कृती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनाला बाधित कुटुंबांना तात्काळ मदत देण्याचे तसेच बेली ब्रिज बांधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाधित भागात वाहतुकीची कामे करण्यासाठी पोलिसांना पाच ट्रान्सपोर्ट ड्रोन देण्यात आले आहेत. वीज पुरवठा सुरू करण्यासाठी पोलिसांना ५० जनरेटरही दिले आहेत. नागरिकांनी नद्यांच्या जवळ जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. लष्कर आणि हवाई दलाची मदत घेण्यात येत आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिमाचल प्रदेशातील ढगफुटीमुळे झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. बेपत्ता नागरिकांचा लवकरात लवकर शोध लागावा अशी इच्छा व्यक्त केली.

Related Articles