हानी अटळ आहे?(अग्रलेख)   

निसर्ग जपत, परिसंस्थांचे नुकसान होऊ न देता जगणे माणसाने शिकले पाहिजे हा संदेश या घटनेने पुन्हा एकदा दिला आहे. सध्या ते अवघड दिसत आहे. त्यामुळे अशी हानीही अटळ ठरत आहे.
 
वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात जे घडले त्याचे वर्णन निसर्गाचा प्रकोप असेच करता येईल. केरळ मधील हा निसर्गरम्य भाग सोमवारी मध्यरात्री नंतर उद्ध्वस्त झाला. अनेक गावांत दरडी कोसळल्या, त्यात किमान १५८ जणांचे बळी गेले. मृतांची संख्या अजूनही वाढण्याची भीती आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार रात्री एक नंतर पहिली दरड कोसळली, नंतर पहाटे साडेचारच्या सुमारास आणखी दरडी कोसळल्या. त्यामुळे अनेक गावे त्याखाली दबली. काही कळण्यापूर्वी झोपेत असलेले रहिवासी मृत्युमुखी पडले. ही घटना कळून प्रशासनाने मदत कार्य सुरु करेपर्यंत बराच  वेळ गेला होता. दरडी कोसळल्याने रस्ते देखील शिल्लक नाहीत अशी काही ठिकाणची स्थिती आहे, तर काही गावेच उरलेली नाहीत. तेथे पोहोचणेही अववघड झाले आहे. मदत पथके पोहोचली तरी सर्वत्र जोराचा पाऊस सुरु असल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे. संपूर्ण घरे किंवा दुकाने जमिनीखाली गेली आहेत. ते खोदून कोणी जिवंत आहे का हे पाहिले जात आहे; पण हाती निराशा येत  आहे. चिखला खाली सापडलेले मृतदेह रुग्णालयात, आरोग्य केंद्रात किंवा तात्पुरत्या छावणीत पोहोचल्यावर त्यात आपले कोणी नातलग आहेत का हे पाहण्यास गर्दी होत आहे. हे दृश्य करुण आहे. हे का झाले हा प्रश्न आता सतावत आहे.

निसर्गावर ताण वाढला

केरळ या आग्नेय दिशेला असलेल्या राज्यात दरवर्षीच  खूप पाऊस होतो. भारतात मान्सून प्रथम याच राज्यात येतो. दरवर्षी दरडी कोसळण्याच्या घटना घडतातही; पण एवढा हाहाकार पूर्वी केरळमध्ये घडल्याचे ऐकिवात येत नव्हते. ताजी घटना दरड कोसळून नुकसान होण्याची राज्याच्या इतिहासातील सर्वात वाईट घटना असल्याचे स्पष्ट होत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी केरळमध्ये अतिवृष्टीने थैमान घातले होते, तेव्हा पूर जास्त आला होता. वायनाड हा जिल्हा केरळच्या उत्तर भागात आहे. तेथील पाच-सहा जिल्ह्यांत यंदा जास्त पाऊस झाला आहे. ३० जुलैच्या सकाळी साडेआठ पर्यंत काही जिल्ह्यांत चोवीस तासांतील सरासरीच्या ३३६ ते ११३९ टक्के पाऊस जास्त झाला. पलक्कड जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी १७.३ मिलिमीटर पाऊस होतो, यावेळी तेथे २१४.३ मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या ११३९ टक्के, तिरुवअनंतपुरममध्ये सरासरीच्या ९१४ टक्के पाऊस जास्त झाला. वायनाड जिल्ह्याची चोवीस तासांची सरासरी २३.९ मिलिमीटर आहे, तेथे १४१.८ म्हणजे ४९३ टक्के पाऊस जास्त झाला; पण नुकसान सर्वात जास्त तेथेच झाले. संपूर्ण केरळ राज्य पश्चिम घाट या डोंगरी भागातच आहे. या भागाची नैसर्गिक परिसंस्था देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मात्र, विकासाच्या नावाखाली या परिसंस्थेत मानवी हस्तक्षेप वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम आता ठळकपणे समोर येत आहेत. या राज्यातून ७० व ८० च्या दशकात अनेकजण आखाती देशांत नोकरीसाठी गेले. तेथून भरपूर पैसा या राज्यात येऊ लागला. साहजिकच बंगले, इमारती यांची बांधकामे वाढली. वायनाड हा जिल्हाही त्यापासून दूर राहिला नाही. ज्या भागात ताजी दुर्घटना घडली तो डोंगराळ आहे. या भागाच्या भूप्रदेशाची रचना दोन  स्तरांची आहे. टणक दगडांचा एक स्तर आणि त्यावर मातीचा थर आहे. अति पावसाने माती खूप ओली होते व पाणी दगडांपर्यंत पोहोचते. दोन स्तरांच्या मध्ये ते वाहू लागले की दगडांना माती चिकटून राहण्याचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे माती व दगड यांची हालचाल सुरु होते. दरड कोसळण्याची घटना त्यातून घडते, असे तज्ज्ञांनी या बद्दल सांगितले आहे. केरळ मधील सुमारे १७ हजार  चौरस किलो मीटर भाग असा दुर्घटना प्रवण असल्याचे भूगर्भ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. जेव्हा राज्याची लोकसंख्या कमी होती, जंगलांत, डोंगरांवर बांधकामे होत नव्हती तेव्हा दरडी कोसळल्या तरी मोठे नुकसान होत नव्हते. माणूस जमीन निर्माण करू शकत नाही आणि पावसावरही त्याचे नियंत्रण नाही. शय तेथे बांधकामे केली जातात. निसर्गाला ते मान्य होत नाही. मग, अशा दुर्घटना घडणे अटळ होते. शिल्लक राहिलेल्यांना मदत करणे तेवढे हाती उरते.

Related Articles