कुख्यात जगदीश भोला याला दहा वर्षांची शिक्षा   

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १७ जण प्रथमच दोषी 

चंडीगढ : अमली पदार्थांचा चोरटा व्यापार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील कुख्यात आरोपी जगदीश सिंग उर्फ भोलासह १७ जणांना पंजाबमधील मोहालीतील पीएमएलए न्यायालयाने मंगळ वारी दोषी ठरवले आहे. भोला याला  दहा वर्षाची आणि त्याची पत्नी गुरूप्रीत कौरला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. कुस्तीपटू, पोलिस कर्मचारी आणि अमली पदार्थांचा चोरटा व्यापार करणारा म्होरया जगदीश भोला आहे. तो  आणि त्याचा सहकारी अवतार सिंग टारो यांनी अन्य सहकार्‍यांच्या मदतीने गैरव्यवहार केला होता. पंजाबमधील आठ पोलिस ठाण्यात २०१३ मध्ये त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्या आधारे ईडीने तपास केला होता. या प्रकरणी २३ जणांवर २०१५ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. त्यापैकी भोला आणि टारो प्रमुख आरोपी घोषित केले झाले होते. ४ जणांचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला होता. 
 
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी १७ जणांना दोषी ठरविल्याची ही पहिलीच घटना ठरली आहे. भोला आणि टारो यांच्यासह  संदीप कौर, जगमिंदर कौर, गुरप्रीत कौर, गुरमीत कौर, सुखजित सिंग सुखा, सुखराज सिंग, गुरदीप सिंग मनचंदा, अमरजीत कौर, देविंदर सिंग, मनिंदर सिंग, सुभाष बजाज, सुनील बजाज, अंकुर बजाज, दिलीप सिंग मान आणि मनप्रीत सिंग यांना न्यायालयाने दोषी ठरविले आहे. अन्य दोषींना  तीन ते दहा वर्षांची शिक्षा देखील ठोठावली आहे. 
 
पंजाबमध्ये २०१३ ते २०१४ दरम्यान कोट्यवधी रुपयांच्या अमली पदार्थांच्या चोरट्या व्यापाराचे जाळे उघडकीस आणले होते. त्यामध्ये भोला प्रमुख आरोपी होता. २०१४ मध्ये भोलाला ईडीने अटक केली होती. तसेच ९५ कोटी रुपये जप्त केले होते. अन्य गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले होते.

Related Articles