जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारातून मौल्यवान वस्तू चोरीस?   

पुरी : ओडिशामधील पुरी येथे असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडारातून मौल्यवान वस्तूंची चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या रत्न भंडाराची देखभाल करण्यासाठी सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या एका सदस्याने याबाबतचा खळबळजनक दावा केला आहे. मौल्यवान वस्तूंची चोरी करण्यासाठी नकली चाव्यांचा वापर केला जात होता, असेही त्यांनी म्हटले आहे.  
 
या समितीचे अध्यक्ष विश्वनाथ रथ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पुरी येथे एक बैठक झाली, त्यानंतर समितीचे सदस्य जगदीश मोहंती यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे. याबाबत प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार  मोहंती यांनी बैठकीनंतर सांगितले की, नकली चाव्या वापरून कुलूप न उघडल्याने ताळे तोडण्यात आले. त्यामुळे किमती वस्तू चोरण्याच्या हेतूने हे कृत्य करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. बनावट चावीचा मुद्दा एक बनाव होता, कारण चोरीच्या प्रयत्नाची शयता नाकारता येत नाही. 
 
२०१८ मध्ये पुरी येथील जगन्नाथ मंदिराच्या रत्न भंडाराच्या खर्‍या चाव्या गायब झाल्या होत्या. त्यानंतर पुरीच्या प्रशासनाने दोन बनावट चाव्या बनवल्या होत्या. मात्र १४ जुलै रोजी जेव्हा रत्न भंडार उघडण्याचा प्रयत्न केला गेला. तेव्हा या चाव्या कुलपांना लागल्या नाहीत. त्यानंतर समितीच्या सदस्यांना रत्न भंडारात जाण्यासाठी तेथील दरवाजांना लावलेले कुलूप तोडावे लागले.
 
निवृत्त आयएएस अधिकारी असलेल्या मोहंती यांनी सांगितले की, त्यांनी बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र समितीला सरकारकडे याबाबत तपास सुरू करण्याची शिफारस करण्याचा अधिकार नाही आहे. मंदिर प्रशासन आम्हाला आलेल्या संशयाबाबत सरकारला माहिती देऊ शकतो. १४ जुलै रोजी रत्न भंडाराच्या अंतर्गत कक्षातील काही खोके उघडलेले आढळून आले होते. तसेच या कक्षामध्ये लाकडाची तीन कपाटे, एक स्टिलचे कपाट, लाकडाच्या दोन पेट्या आणि एक लोखंडी पेटी होती. मंदिर प्रशासनाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ लाकडाचे एक कपाटच बंद असल्याचे दिसून आले. 

Related Articles