विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियानांतर्गत होणार शाळांची तपासणी   

पुणे : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष काय स्थिती आहे, पाठ्यपुस्तकातील कोर्‍या पानांचा प्रभावी उपयोग होतो किंवा नाही, शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कशी आहे, आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी कोणत्या पद्धतीने केली जाते, गणवेशाची उपलब्धता काय आहे, यासह अनेक योजनांची व उपक्रमांची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून ’विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियाना’ अंतर्गत घेतली जाणार आहे. येत्या १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत या संदर्भातील अहवाल सर्व शिक्षण अधिकारी व शाळांचा तयार करावा लागणार आहे.
 
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे येत्या ऑगस्ट महिन्यात विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान राबविले जाणार आहे. या अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणार्‍या विविध योजना शिक्षण विभागातर्फे दिल्या जाणार्‍या सोयी सुविधा या संदर्भात प्रत्यक्ष शाळात जाऊन तपासणी केली जाणार आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भातील निर्णय घेण्यात आला. त्यावर राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून या अभियानाबाबत माहिती दिली आहे.
 
विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियानादरम्यान पहिल्या वीस दिवसात प्रत्यक्ष शाळा भेटी करणे, त्यानंतर सहा दिवसात आवश्यकतेनुसार सुधारणा किंवा उपाययोजना करणे, त्यानंतर चार दिवसांमध्ये अंमलबजावणी झाली किंवा नाही याची खात्री करणे, अशा पद्धतीने या अभियानाची कार्यदिशा ठरवण्यात आली आहे. शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी गटशिक्षणाधिकारी व तत्सम पदावरील अधिकारी यांनी सोमवार व शुक्रवार वगळता इतर दिवस शाळा भेटी द्याव्यात. तसेच सरल पोर्टलवरून केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण अधिकारी, प्राचार्य विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी प्रत्येक शाळांना भेटी दिल्यानंतर किंवा निरीक्षण केल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल लॉगिन मधून दररोज अद्यावत करावा.
 
शिक्षण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपसंचालक यांनी जास्तीत जास्त शाळा तपासल्या जाते, अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवून घ्यावे दिलेली माहिती अचूक व संकलित करून विद्यार्थ्यांपर्यंत शाळांच्या विविध योजना योग्य प्रकारे पोहोचत आहे काय?  याची खातरजमा करावी,अशाही सूचना शिक्षण आयुक्तांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत.

कोणत्या गोष्टी तपासणार 

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या भोजनाचा दर्जा, परसबाग विकास स्थिती, स्वयंपाक गृह उपलब्धता 
स्काऊट गाईड प्रशिक्षण व तासाचे आयोजन
विविध संस्थांनी शासनासोबत केलेल्या कराराबद्दलचे अंमलबजावणी
वर्ग खोल्यांची स्थिती 
स्वच्छतागृहाची उपलब्धता,
स्वच्छता मॉनिटर उपक्रमाची अंमलबजावणी 
अध्ययन व अध्यापन साहित्याची उपलब्धता
शाळांमधील इंटरनेट सुविधा
दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती
पाठ्यपुस्तकातील कोर्‍या पानांचा प्रभाव उपयोग 
विद्यार्थी उपस्थित व आधार नोंदणी
आनंददायी शनिवार अंमलबजावणी
शाळांची वेळ ठरवण्यात बाबतची स्थिती

Related Articles