बलुचिस्तानात आंदोलकांचा लष्करावर हल्ला; एक सैनिक ठार   

निषेध मोर्चाला  प्रचंड प्रतिसाद
 
क्वेट्टा : पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिमेकडील ग्वादर शहरात मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी सोमवारी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांवर हल्ला केला, ज्यात एक सैनिक ठार झाला. तर अधिकार्‍यासह १६ जण जखमी झाले.सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या आपल्या चळवळीतील सदस्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी वांशिक बलोच चळवळ गेल्या दोन दिवसांपासून बंदरात निदर्शने करत आहे आणि महामार्ग रोखून धरत आहे. ग्वादरमधील निषेध मोर्चाला नागरिकांचा सोमवारी मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, आंदोलकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या लष्करी जवानांवर हल्ला केला. बलुचिस्तानात विविध भागांत पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन आंदोलक ठार झाले तर सातहून अधिक जखमी झाले. अटक केलेल्यांची सुटका होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका बलोच नागरिकांनी घेतली आहे.  
 
बलुचिस्तान यजेहती समितीच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांची प्रांतातील विविध भागांत पाकिस्तानी सुरक्षा रक्षकांशी झटापट झाली. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी एका चेकपोस्टवर आंदोलकांच्या ताफ्याला अडवले. त्यावेळी आंदोलकांनी चेकपोस्टवर हल्ला चढवला. त्यावेळी सुरक्षा दलाने स्वत:च्या बचावासाठी केलेल्या गोळीबारात दोन ठार झाले. तर दोन जण जखमी झाले. 
 
दुसर्‍या घटनेत ग्वादरच्या मरीन ड्राइव्हवर बलुच राजी मुचीसाठी जमले होते.  त्यावेळी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केल्याने झालेल्या हाणामारीत आणखी एकाचा मृत्यू झाला असून, आठ जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे. बलुचिस्तान विद्यापीठासमोर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर हल्ला केला आणि बारा महिला आणि पन्नासहून अधिक पुरुष आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. 

Related Articles