व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मादुरो विजयी घोषित   

काराकस : व्हेनेझुएलाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकोलस मादुरो यांना विजयी घोषित करण्यात आले. मात्र, विरोधी पक्षनेते अनियमिततेचा आरोप करत निकालाला विरोध करण्याच्या तयारीत आहेत.व्हेनेझुएलामध्ये रविवारी अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. मध्यरात्रीनंतर नॅशनल इलेटोरल कौन्सिलने सांगितले की, मादुरो यांना ५१ टक्के मते मिळाली, तर विरोधी पक्षाचे प्रमुख उमेदवार एडमुंडो गोंजालेज यांना ४४ टक्के मते मिळाली. मदुरो समर्थकांच्या नियंत्रणाखालील निवडणूक प्राधिकरणाने अद्याप ३० हजार मतदान केंद्रांवरील मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही, त्यामुळे विरोधकांना निकालाची पुष्टी करता आलेली नाही.
 
निवडणूक परिषदेने येत्या काही तासांत अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याचे आश्वासन दिल्याने परदेशी नेत्यांनी अद्याप निकालाला मान्यता दिलेली नाही. चिलीचे नेते गॅब्रिएल बोरिक म्हणाले, मादुरो सरकारने हे समजून घेतले पाहिजे की, त्यांनी प्रकाशित केलेल्या निकालांवर विश्वास ठेवणे कठीण आहे.    
 
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी टोकियोमध्ये सांगितले की, त्यांच्या देशाला या घोषणेबद्दल गंभीर चिंता आहे. अखेर मादुरो निकालाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेर आले तेव्हा त्यांनी अज्ञात परदेशी शत्रूंवर मतदान प्रणाली हॅक करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांनी आपल्या विजयाच्या समर्थनार्थ कोणतेही पुरावे दिले नाहीत; परंतु व्हेनेझुएलामध्ये हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना शिक्षा करण्याचे आश्वासन दिले.
 
विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, त्यांनी मतदान केंद्रांवर गोळा केलेल्या आकडेवारीवरून गोंजालेज मादुरो यांचा पराभव करीत असल्याचे दिसून येते. दरम्यान, येत्या काही तासांत मतदानाची अधिकृत आकडेवारी जाहीर करणार असल्याचे निवडणूक परिषदेच्या प्रमुखांनी सांगितले.राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना तिसर्‍यांदा गोंजालेज यांच्याकडून कडवे आव्हान आहे. विरोधी पक्षनेत्यांना गोंजालेज यांच्या विजयाची खात्री होती आणि त्यांनी काही मतदान केंद्रांबाहेर जल्लोष करण्यास सुरुवात केली होती.

Related Articles