’क्वाड’ देशांच्या सहकार्यामुळे भारत-प्रशांत क्षेत्र सुरक्षित राहील   

टोकियो : भारत-प्रशांत क्षेत्रात चीनच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर क्वाड गटातील देशांच्या सहकार्यामुळे भारत-प्रशांत क्षेत्र मुक्त आणि सुरक्षित राहील, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सांगितले. नियमाधारित सुव्यवस्था राखण्याची अतिरिक्त जबाबदारी ’क्वाड’वर असल्याचेही ते म्हणाले.
टोकियोत क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना जयशंकर म्हणाले, राजकीय लोकशाही, बहुलवादी समाज आणि बाजार अर्थव्यवस्था म्हणून नियमाधारित व्यवस्था टिकवणे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 
 
क्वाड देशांच्या सहकार्यामुळे भारत-प्रशांत क्षेत्र खुले, स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध राहील. जगाच्या भल्यासाठीची आमची बांधिलकी या प्रदेशाच्या पलीकडे आहे. त्यामुळे आपली आर्थिक भागीदारी वाढविणे, तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविणे आणि आपल्या लोकांमधील संबंध अधिक दृढ करणे महत्त्वाचे आहे.    
 
क्वाड हा अस्तित्व, काम आणि वाढीचा विषय आहे, असा स्पष्ट संदेश बैठकीत द्यायला हवा. आमचे सामूहिक प्रयत्नच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला मानवनिर्मित किंवा नैसर्गिक अडथळ्यांपासून वाचवू शकतात. भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी इंडो-पॅसिफिकमधील महत्त्वाच्या सागरी मार्गांना कोणत्याही प्रभावापासून मुक्त ठेवण्यासाठी नवी रणनीती तयार करण्यासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये ’क्वाड’ची स्थापना केली. दक्षिण चीन समुद्र हिंदी आणि पॅसिफिक महासागरांच्या मध्ये स्थित आहे. दक्षिण चीन समुद्राच्या बहुतांश भागावर चीनचा दावा आहे, तर फिलिपाईन्स, व्हिएतनाम, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान हे देशही या सागरी क्षेत्रावर आपला दावा करतात.जयशंकर यांच्यासह अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन, जपानचे परराष्ट्रमंत्री योको कामिकावा आणि ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग या बैठकीला उपस्थित होते. 

Related Articles