भाजप नेत्यांचे स्वागत भोवले; दोघांचे निलंबन   

भोपाळ : मध्य प्रदेशात एका भाजप नेत्याचे स्वागत करणे काँग्रेसच्या नेत्यांना चांगलेच भोवले. कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे स्वागत केल्याप्रकरणी  इंदूर काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरजीत चढ्ढा आणि ग्रामीण अध्यक्ष सदाशिव यादव यांचे निलंबन करण्यात आले आहे. संघटन प्रभारी राजीव सिंह यांनी ही कारवाई केली आहे.
 
एक पेड माँ के नाम मोहिमेत काँग्रेसचा पाठिंबा घेण्यासाठी मंत्री कैलाश विजयवर्गीय आणि इतर भाजप नेते इंदूरमधील जिल्हा काँग्रेस कार्यालयात गेले होते. यावेळी विजयवर्गीय यांचे जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यावरून राजीव सिंह यांनी या दोन नेत्यांना नोटीस बजावून सात दिवसांत उत्तर मागितले आहे. 
 
नोटीसमध्ये लिहिले आहे की, एक असा व्यक्ती, ज्याने माता अहिल्याच्या नगरीत लोकशाही मूल्यांची हत्या केली. इंदूरच्या जनतेकडून मतदानाचा हक्क काढून घेऊन त्यांनी इंदूरची देश-विदेशात बदनामी केली, ज्याचा इंदूरच्या जनतेने निषेधही केला. अशा व्यक्तीचे इंदूर जिल्हा काँग्रेस कमिटीने गांधी भवनात स्वागत करणे हे अनुशासनहीनतेच्या श्रेणीत येते. तुम्ही सात दिवसांत याचे स्पष्टीकरण द्या. या कालावधीत तुम्हाला तुमच्या सध्याच्या पदावरून निलंबित करण्यात आले आहे.

Related Articles