‘आप’ आणि भाजपची निदर्शने   

दिल्लीतील कोचिंग सेंटर प्रकरण

नवी दिल्ली : दिल्लीतील कोचिंग सेंटरमधील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूस आम आदमी पक्ष आणि भाजपने एकमेकांना जबाबदार धरले आहे. या दोन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. तसेच, एकमेकांवर आरोप केले.आम आदमी पक्षाने नायब राज्यपालांच्या सचिवालयासमोर काल आंदोलन केले. दिल्लीतील नाल्यांचे गाळ काढण्याचे निर्देश देण्यात अपयशी ठरलेल्या अधिकार्‍यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.  
 
मंत्र्यांच्या आदेशानंतरही नाल्यांमधील गाळ काढण्याचे निर्देश न देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची विनंती आम्ही नायब राज्यपाल व्ही. के. ससेना यांच्याकडे असल्याचे ‘आप’चे आमदार दिलीप पांडे यांनी सांगितले. तर, ‘आप’चे आमदार आणि एमसीडीचे प्रभारी दुर्गेश पाठक यांनी भाजपवर राजकारण केल्याचा आरोप केला. गेली १५ वर्षे दिल्ली महानगरपालिकेत भाजपची सत्ता होती. त्यांनी ड्रेनेजचे काम केले नाही. परंतु, आता ते राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
 
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयाजवळ निदर्शने केली. कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूला ‘हत्या’ असे संबोधत केजरीवाल सरकारच्या राजीनाम्याची मागणी केली. ते विद्यार्थी देशाच्या भविष्य होते. दिल्ली आणि एमसीडीवर राज्य करणार्‍या आम आदमी पक्षाच्या भ्रष्टाचारामुळे त्यांचा जीव गेला असा आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला.हा अपघात नसून हत्या आहे, असेही ते म्हणाले. या विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. मग ते एमसीडी असोत किंवा इतर कोणत्याही संस्थेतील असोत, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असेही सचदेवा म्हणाले. जलमंत्री आतिशी आणि राजेंद्र नगरच्या ‘आप’ आमदारानेही राजीनामा द्यावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली.दरम्यान, ‘आप’ मुख्यालयात जाण्याचा प्रयत्न करणार्‍या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी पाण्याचा जोरदार मारा केला. 

Related Articles