धरण क्षेत्रात धुवाधार; पुण्यातही पावसाच्या सरी   

भिडे पूल पुन्हा पाण्याखाली

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात जोरदार ते मुसळधार पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. सोमवारी डेक्कन परिसरातील भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला. दरम्यान, काल सायंकाळपासून शहर आणि परिसरात पावसाचा वेग वाढला आहे.
 
पाणलोट क्षेत्रातील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरण परिसरात पावसाचे सातत्य कायम आहे. त्यामुळे चारही धरणांत २५.२२ टीएमसी पाणी साठले आहे. यात कोकणाच्या सीमेवरील घाट क्षेत्रातून येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार, पाटबंधारे विभागाकडून धरणांतून पाणी सोडले जात आहे. सध्या, पानशेत धरण ९५, वरसगाव ८२, खडकवासला ८६, तर टेमघर ८० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत चार धरणांत एकूण २१.६२ टक्के टीएमसी पाणी साठले होते. तर धरणांची टक्केवारी ७४.१७ होती. 
 
काल पहाटे ४ वाजता पानशेत धरणाच्या कालव्यातून १५ हजार १३६ युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. खडकवासला धरणात पाणी वाढल्याने सकाळी ९ वाजता या धरणातून २२ हजार ८८० युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. त्यात वाढ करून दुपारी १२ वाजता २५ हजार ३६ युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. 
 
पाणी सोडण्याआधी नदीपात्रालगतच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. तसेच, नदीपात्रात लावण्यात येणार्‍या गाड्या, हातगाडे काढून घेण्याचे आवाहन पोलिस व महापालिका प्रशासनाने केले होते. 
 
चार दिवसांपूर्वी नदीपात्रातील पाणी शेजारच्या सोसायट्या व वस्त्यांमध्ये शिरले होते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. भिडे पूल पाण्याखाली गेल्याने तसेच नदीपात्र दुथडी भरुन वाहत असल्याने पाणी पाहण्यासाठी डेक्कन परिसरात पुणेकरांनी गर्दी केली होती. 

पाण्यामुळे वाहतुकीत बदल 

खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने मुठा नदीपात्रातील रस्ता पुन्हा पाण्याखाली गेला. त्यामुळे नदीपात्रातील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली. तसेच, भिडे पूल पाण्याखाली गेल्याने डेक्कन आणि नारायण पेठ दोन्ही बाजूने या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या रस्त्यांवर दुपारपासून वाहतूक कोंडी झाली होती. 

Related Articles