पूर रेषा नव्याने निश्चित करा; पर्यावरण प्रेमींची मागणी   

पुणे : मुठा नदीत ३५ हजार युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर पुण्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नदीतील अतिक्रमण, बांधकामाला दिल्या जाणार्‍या परवानगीमुळे ही परिस्थिती उद्भवली असून, नव्याने पूररेषा निश्चित केली पाहिजे अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
 
खासदार वंदना चव्हाण, शिवसेनेचे महापालिकेतील माजी गटनेते पृथ्वीराज सुतार, सजग नागरीक मंचचे विवेक वेलणकर, आपचे विजय कुंभार, पर्यावरण प्रेमी सारंग यादवाडकर, भाऊसाहेब आजबे आदिंनी पत्रकार परिषदेत मुठा नदीच्या पुरासंदर्भात चिंता व्यक्त केली. पुणे बचाव ही मोहिम सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
गेल्या आठवड्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर नदीकाठच्या भागात पाणी शिरले होते. याविषयी उपस्थितांनी भूमिका मांडत महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले आहे. नदीतील अतिक्रमणांकडे दुर्लक्ष, नदीपात्रात आणि लगत टाकला जाणारा राडारोडा, मेट्रोला बांधकाम करण्यास दिलेली परवानगी, लाल आणि निळ्या पूररेषेच्या क्षेत्रात झालेली बांधकामे, तसेच नदीकाठ सुधार प्रकल्पामुळे मुठा नदीतील पाण्याची वहन क्षमता कमी झाल्याचा दावा उपस्थितांनी केला.
 
पुण्यात पुरस्थिती निर्माण होण्यासाठी धरणातून किमान एक लाख युसेक इतया वेगाने पाणी सोडणे आवश्यक आहे. परंतु केवळ ३५ हजार युसेक क्षमतेने पाणी सोडल्यावर पूर आला, एक लाख युसेक क्षमतेने पाणी सोडले तर काय होईल असा प्रश्न उपस्थित केला आहे. यापुर्वी साठ ते ९० हजार युसेक क्षमतेने पाणी सोडले गेले तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली नाही. आत्ताच ही परिस्थिती का निर्माण झाली याचा विचार करण्याची गरज आहे. नव्याने पूररेषा निश्चित झाली पाहिजे. सगळी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पावसाचे अजुन दोन महिने बाकी आहेत, येणार्‍या काळात पुराचा धोका वाढणार आहे अशी भिती त्यांनी व्यक्त केली.

इतर महत्त्वाचे दावे

* नदी सुधार प्रकल्पात रस्ता तयार केल्यानंतर या भागातील राडा रोडा काढला जात नाही.
* लाल आणि निळ्या पुररेषेच्या आत बांधकामाला परवानगी देणार्‍यांवर कारवाई करावी.
* नदीची मालकी कोणाची, जिल्हाधिकारी, महापालिका की जलसंपदा यांची हे आधी स्पष्ट होणे गरजेचे.
* नदीपात्रात अनेक ठिकाणी भराव टाकून जमीन तयार करण्यात आले आहे.

Related Articles