आशिया कप २०२५ स्पर्धा भारतात होणार   

नवी दिल्ली : पुरुषांच्या आशिया कप २०२५ च्या यजमानपदाची घोषणा करण्यात आली आहे. २०२५ मध्ये होणारा पुरुष आशिया कपच यजमान पद भारताकडे आले आहे. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जणार आहे. भारताला ३४ वर्षांनंतर आशिया चषकाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. १९९०-९१ मध्ये भारतात शेवटचा आशिया चषक झाला होता, त्यावेळी ही या स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. कोलकात्यात झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले. 
 
भारताने २०२३ मध्ये  झालेल्या आशिया कपमध्ये विजेतेपद मिळवले. २०२६ च्या टी-२० विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ चा आशिया कप बांगलादेशमध्ये होणार असून ही स्पर्धा एकदिवसीय प्रकारात खेळवली जाणार आहे. २०२७ ला दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या एकदिवसीय विश्वचषकाची पूर्व तयारी म्हणून हा निर्णय घेतला आहे.  
 
आशिया क्रिकेट कंट्रोलकडून आशिया कप स्पर्धांचे आयोजन केले जाते. आशिया कप स्पर्धेत भारताचे वर्चस्व कायम राहिले आहे. भारताने आठ वेळा आशिया कपचे विजेतेपद मिळवले आहे. यामध्ये भारताने सात एकदिवसीय आणि एका टी-२० स्पर्धेचे विजेतेपद भारताला मिळाले आहे. तर श्रीलंकेने सहा वेळा विजेतेपद मिळवले आहे. भारत आणि श्रीलंकेनंतर पाकिस्तान तिसर्‍या स्थानावर आहे. पाकिस्तानने दोन वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने २०२३ च्या आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत केले होते. भारताने श्रीलंकेला १५.२ ओव्हरमध्ये ५०  धावांवर बाद केले होते. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारताने हा सामना १० गडी राखून जिंकला होता. 

पाकिस्तान भारतात येणार?

पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानमध्ये होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत घ्यावेत, अशी भूमिका बीसीसीआयने घेतली आहे. आयसीसीने त्याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. जर, भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तनला गेला नाही, तर, आगामी आशिया कपमध्ये पाकिस्तान भारतात खेळण्यासाठी येईल का प्रश्न कायम आहे. 

टी-२० विश्वचषकाची तयारी सुरू

२०२६ चा आयसीसी टी-२० विश्वचषकाचे आयोजन भारत आणि श्रीलंका यांच्याकडून केले जाणार आहे. आगामी टी-२० विश्वचषकाची तयारी म्हणून सूर्यकुमार यादवकडे नेतृत्त्व देण्यात आले आहे. श्रीलंकेत सुरु असलेल्या मालिकेत भारताने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वात २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्यासारखे दिग्गज खेळाडू नसल्याने युवा खेळाडूंना सोबत घेत गौतम गंभीरकडून संघाची बांधणी सुरु करण्यात आलेली आहे.

Related Articles