शूटिंगमध्ये रमिता जिंदालचे स्वप्न भंगले   

पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये सोमवारी तिसर्‍या दिवशी भारताच्या रमिता जिंदालने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत भाग घेतला. मात्र या पदकाच्या लढतीत रमिताच्या पदरी निराशा आली आहे. रमिता ८ जणांच्या इव्हेंटमध्ये ७ व्या स्थानी राहिली. तिने एकूण १४५.३ गुण मिळवले.
 
पात्रता फेरीत २० वर्षीय रमिता पाचव्या स्थानावर राहिली होती. रमिताने पात्रता फेरीत ६० शॉट्समध्ये ६३१.५ गुण मिळवले होते. रमिताने पहिल्या सिरीजमध्ये १०४.३, दुसर्‍यामध्ये १०६.०, तिसर्‍यामध्ये १०४.९, चौथ्यामध्ये १०५.३, पाचव्यामध्ये १०५.३ आणि सहाव्या सिरीजमध्ये १०५.७ गुण मिळवले होते. महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारताची एलावेलिन वॅलारिव्हनही सहभागी झाली होती, परंतु ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकली नाही. वालारिवन ६३०.७ गुणांसह १० व्या स्थानावर राहिली.
 
हरियाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील रमिता ही अकाउंट्सची विद्यार्थिनी आहे. रमिताचे वडील अरविंद जिंदाल हे टॅस सल्लागार आहेत. २०१६ मध्ये रमिताला तिचे वडील शूटिंग रेंजमध्ये घेऊन गेले होते. यानंतर रमिताचा या खेळाकडे कल वाढला. २० वर्षीय रमितानं २०२२ मध्ये ज्युनियर आयएसएसएफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होेते. त्यानंतर तिने हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतही दोन पदके जिंकली.

Related Articles