हरमनप्रीतच्या गोलमुळे भारताने अर्जेंटिनाला बरोबरीत रोखले   

पॅरिस : ऑलिम्पिकमध्ये न्यूझीलंडचा ३-२ ने पराभव करून विजयी सुरुवात करणार्‍या भारताच्या हॉकी संघाला दुसर्‍या सामन्यात संघर्ष करावा लागला.  अर्जेंटिनाने एक गोल करून आघाडी घेतली होती. १-० अशी आघाडीनंतर अर्जेंटिनाने बचाव खेळ करण्यावर भर दिला. तिसर्‍या क्वार्टरची अखेरची दोन मिनिटे शिल्लक असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांना संधीचे सोने करता आले नाही. 
 
तिसर्‍या क्वार्टरअखेरपर्यंत अर्जेंटिनाने ही आघाडी कायम ठेवली होती. त्यामुळे पुढची १५ मिनिटे अर्थात अखेरचा चौथा क्वार्टर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. पण, इथेही भारतीय शिलेदार संघर्ष करताना दिसले. सामन्यातील शेवटचे २.०८ मिनिटे राहिलेले असताना भारताला पेनल्टी कॉर्नरच्या रूपात दोन संधी मिळाल्या. त्यावर अखेर पावणेदोन मिनिटे शिल्लक असताना भारताने गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. अर्टेंटिनाने भारताच्या गोलला आव्हान देत रिव्ह्यू घेतला पण याचा निकाल भारताच्या बाजूनेच लागला. अखेर १-१ अशा बरोबरीत सामना संपला भारतीय संघाने सामना वाचविला. अर्जेंटिना अद्याप आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही हा सामना पाहण्यासाठी हजेरी लावली होती. 
 
२००४ नंतर प्रथमच भारत आणि अर्जेंटिना यांच्यातील ऑलिम्पिकमधील सामना अनिर्णित राहिला. तब्बल ५८ मिनिटे गोलसाठी संघर्ष करणार्‍या टीम इंडियाने पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करून १-१ अशी बरोबरी साधली. हरमनप्रीतने भारतासाठी एकमेव गोल केला. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील आपल्या सलामीच्या सामन्यात अर्जेंटिनाला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तर भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करून विजयी सलामी दिली. ऑलिम्पिकमधील आकडेवारी पाहता भारतीय संघ अर्जेंटिनाला नेहमीच वरचढ राहिला आहे. हे संघ ऑलिम्पिकमध्ये अकरावेळा आमनेसामने आले आहेत. यात भारताने आठवेळा विजय संपादन केला, तर अर्जेंटिनाला एक सामना जिंकता आला. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत.

Related Articles