इस्रायलचा गाझावर हवाई हल्ला   

खान युनूस (गाझा पट्टी) : इस्रायलने मध्य गाझाच्या दीर अल-बलाह येथील एका शाळेवर केलेल्या हवाई हल्ल्यात लहान मुलांसह ३० जण ठार झाले. या शाळेत विस्थापित पॅलेस्टिनी राहत होते. पॅलेस्टाईनचे वाटाघाटीकार प्रस्तावित शस्त्रसंधीवर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थांना भेटण्याच्या तयारीत असताना हे हल्ले झाले.इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, शस्त्रे ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची योजना आखण्यासाठी वापरल्या जाणार्‍या हमासच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात शाळेत आश्रय घेतलेले ३० जणांचा मृत्यू झाला.  तर काही जण जखमी झाले असून, त्यांना अल असा रुग्णालयात नेण्यात आले आहे. मृतांमध्ये सात लहान मुलांचा समावेश आहे. 
 
गाझामधील नागरी सुरक्षा कर्मचार्‍यांनी सांगितले की, हजारो लोकांनी या शाळेत आश्रय घेतला आहे. या ठिकाणी एक वैद्यकीय केंद्र देखील आहे. शनिवारी झालेल्या इतर हल्ल्यांमध्येही १२ जण ठार झाले होते. अमेरिका, इजिप्त, कतार आणि इस्रायलचे अधिकारी इटलीत भेटून शस्त्रसंधीवर चर्चा करणार होते.दरम्यान, इस्रायली लष्कराने खान युनूस यांच्यावर नियोजित हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गाझामधील मानवतावादी क्षेत्राचा एक भाग रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. त्या भागातून झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने हा आदेश दिला होता.

Related Articles