महात्मा गांधींचा संदेश आजही प्रभावी : जयशंकर   

टोकियोत पुतळ्याचे अनावरण

टोकियो : जगभरात संघर्ष वाढत आहेत, प्रचंड तणाव आणि ध्रुवीकरण आहे, रक्तपात होत आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींचा संदेश आपणाला लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये रणांगणातून शांतता नांदू शकत नाही आणि हे युद्धाचे युगही नाही, हा महात्मा गांधींचा संदेश आजही तितकाच प्रभावी आहे, जितका तो ८० वर्षांपूर्वी होता, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले.
 
एस. जयशंकर दोन दिवासांच्या जपान दौर्‍यावर आहेत.  क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी टोकियोतील एडोगावा येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी ते म्हणाले, एडोगावा वॉर्डने भारतासोबतचे संबंध दृढ करण्यासाठी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा अप्रतिम पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील लोक गांधीजींना राष्ट्रपिता मानतात. पण, जगासाठी तो खर्‍या अर्थाने जागतिक आयकॉन आहे. रणांगणातून उपाय निघत नाहीत आणि कोणतेही युग हे युद्धाचे युग नसावे हा महात्मा गांधींचा चिरंतन संदेश आजही जगाला लागू आहे. त्यांचा दुसरा संदेश शाश्वतता, हवामान अनुकूलता, हरित विकास, हरित धोरणांच्या संदर्भात आहे. गांधीजी हे शाश्वत विकासाचे मूळ प्रेषित होते.
 
महात्मा गांधी हे निसर्गाशी एकरूप राहण्याचे सर्वात मोठे समर्थक होते. म्हणून गांधीजींचा संदेश केवळ सरकारांसाठी नाही, तर प्रत्येकाने तो आपल्या वैयक्तिक आयुष्यात स्वीकारला पाहिजे. ही अशी गोष्ट आहे जी आपण पुढील पिढ्यांकडे पाठवतो. गांधींशिवाय भारताला स्वातंत्र्यासाठी दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असता किंवा कदाचित वेगळ्या मार्गावर गेला असता, असेही ते म्हणाले.

Related Articles