कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू   

दिल्लीतील घटना; सेंटरच्या मालकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीत शनिवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसानंतर राव आयएएस कोचिंग सेंटरच्या इमारतीच्या तळघरात पाणी साचले होते. त्यामुळे वाचनालयात अनेक विद्यार्थी अडकले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राव, कोचिंगचे मालक-समन्वयक अभिषेक गुप्ता आणि देशपाल सिंग यांना अटक केली आहे. 
 
दिल्लीतील जुन्या राजेंद्रनगर भागात मुसळधार पाऊस झाला होता.  राव आयएएस कोचिंग सेंटरमध्ये तिन्ही विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेची तयारी करत होते. तिघांचेही मृतदेह तळघरातून बाहेर काढण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले असून त्यांचीही ओळख पटली आहे.तानिया सोनी (तेलंगणा), श्रेया यादव (उत्तर प्रदेश) आणि नेविन डॅल्विन (केरळ), अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.
 
दिल्ली अग्निशमन विभागानुसार शनिवारी सायंकाळी सुमारे ७ वाजता कोचिंग सेंटरमध्ये पाणी साचल्याची माहिती मिळाली. फोन करणार्‍या व्यक्तीने सांगितले की, तेथे काही जण अडकले असण्याची शयता आहे. आता संपूर्ण तळघर पाण्याने कसे भरले ? याचा शोध घेतला जात आहे.

पोलिसांनी कोणती कलमे लावली?

दिल्ली पोलिसांनी कोचिंग सेंटरचे मालक गुप्ता यांना अटक केली असून निर्दोष विद्यार्थ्यांच्या हत्येसह इतर आरोपांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकारी हर्षवर्धन म्हणाले, भारतीय न्याय संहिता (बीएनएस) ची कलम १०५ ( हत्येचा दोष), १०६ (१) (एखाद्या व्यक्तीचा अविचारी किंवा निष्काळजी कृत्याने मृत्यू होणे). आयपीसी, ११५ (२) ( दुखापत केल्याबद्दल शिक्षा), २९० (इमारती पाडणे, दुरुस्ती किंवा बांधकाम करण्याबाबत निष्काळजीपणा) आणि कलम ३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली सरकारकडून चौकशीचे आदेश

प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की तळघरात एक वाचनालय होते. तेथे सुमारे ३०-३५ विद्यार्थी उपस्थित होते.  तळघर मोठ्या प्रमाणात पाण्याने भरले होते आणि अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी दोरीचा वापर करण्यात आला होता. एका पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, कोचिंग सेंटरमध्ये पाणी भरले असता तेथे ठेवलेले फर्निचर तरंगू लागले. त्यामुळे बचाव करण्यात अडचण आली. दरम्यान, दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी समाज माध्यमावर टाकलेल्य पोस्टमध्ये सांगितले की, प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दंडाधिकारी यांना दिले आहेत. जबाबदार असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही.

विद्यार्थी रस्त्यावर उतरले

विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ अनेक सहकारी विद्यार्थी आंदोलन करत आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी अधिकारी व प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दिल्ली महापालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केला. आम्हाला न्याय द्या, अशा घोषणा विद्यार्थी देत होते. त्यांनी करोल बाग मेट्रो स्थानक परिसरात आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील वाहतूक बंद झाली. तसेच विद्यार्थी आणि पोलिसांत झटापटही झाली. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यांना बसमधून पोलिसांनी नेले. यानंतर आंदोलन करणारे पळून गेले. यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.  

असुरक्षित बांधकामामुळे नागरिकांना फटका : राहुल

असुरक्षित बांधकामाचे मोल नागरिकांना प्राण देऊन चुकवावे लागत आहे. खराब शहर नियोजन आणि संस्थात्मक पातळीवरील बेजाबबदारपणामुळे अशा घटना घडत असल्याची टीका काँग्रेसचे लोकसभेचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केली. कोचिंग सेंटरमधील तीन विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर राहुल बोलत होते. गांधी यांनी या संदर्भातील पोस्ट त्यांनी एसवर टाकली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा झालेला मृत्यू दुदैंवी आहे. काही दिवसांपूर्वी विजेचा झटका बसून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. इमारती कोसळून सामान्य नागरिकांचा हाकनाक बळी जात आहे. एक प्रकारे असुरक्षित बांधकामाची किंमत त्यांना मोजावी लागत आहे. खराब शहर नियोजन आणि बेजाबाबदारपणामुळे नागरिक बळी पडत असल्याबद्दल त्यांनी दु:ख व्यत केले.

Related Articles