भंडारा जिल्ह्यात मुसळधार   

गोसीखुर्द धरणाचे दरवाजे उघडले

अलमट्टीतून विसर्ग; पंचगंगेची पाणीपातळी घटली

मुंबई : राज्यातील  भंडारा जिल्ह्यात रविवारी मुसळधार पाऊस पडला. पाउणी येथील वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात  मुसळधार पाऊस झाल्याने धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडले असून २ लाख ५० हजार युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 
 
दरम्यान, कर्नाटकातील अलमट्टी धरणामधून सव्वातीन लाख युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठच्या रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. पाणीपातळीत एक इंचाने घट झाली आहे. सध्या पाणी पातळी ४७.७ फुटांवर आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद केले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग थांबला आहे.      
 
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संभाजी घोरपेडे यांनी ह्रदयविकाराचा त्रास जाणविणार्‍या  एका रुग्णाला भरपावसात पुराच्या पाण्यातून बोटीच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. वेळीच उपचार झाल्यामुळे रुग्णाचा जीव वाचला आहे. नांदेडमध्ये एका तरुणाला पुराच्या पाण्यात दुचाकी घालणे महागात पडले. त्याची दुचाकी पाण्यातून वाहून गेली. तो मात्र बचावला. याबाबतची चित्रफीत समाज माध्यमावर फिरली आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुयातील वाघाडी नदीला पूर आला आहे. या पुरात एका झाडावर तीन जण अडकले आहेत. ते सुटकेच्या प्रतीक्षेत होते. गडचिरोली जिल्ह्यात रिमझिम पाऊस पडत आहे. पार्लकोटा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे. 

Related Articles