व्यंग्यचित्राचा वारसा आता तरुणाईने चालवावा   

ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांचे आज १०० व्या वर्षात पदार्पण 

पुणे : व्यंग्यचित्रांनी आजपर्यंत समाजाचे मनोरंजन केले आहे, तसेच योग्य मार्गही दाखविला आहे. येत्या काळातही व्यंग्यचित्रांची समाजाला गरज आहे. आम्ही जमेल तितका काळ कलेची जोपासना केली आहे. आता इच्छा असूनही वयामुळे व्यंग्यचित्रांत काम करता येणार नाही. त्यामुळे समाज प्रबोधनाची कला तरूणांनी पुढे घेवून जावी, अशी अपेक्षा ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस यांनी व्यत केली. 
 
शि. द. फडणीस आज (सोमवारी) १०० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांनी ‘केसरी’शी संवाद साधला. तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात विकसित झाले असून त्याचा प्रत्येक क्षेत्रात वापर होत आहे. व्यंग्यचित्रासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. तसेच या कलेच्या प्रसार आणि प्रचारासाठी समाज माध्यमे उपलब्ध आहेत. त्यामुळे तरूणांनी तंत्रज्ञान अवगत करून समाज माध्यमांच्या माध्यमातून या कलेची व्याप्ती अधिक विस्तारीत करावी. व्यंग्यचित्राचा वारसा तरूणाईने सक्षमपणे नेल्यास त्याचा मला मनस्वी आनंद होईल, असेही फडणीस म्हणाले.
 
व्यंग्यचित्र हे प्रबोधनाचे माध्यम असून बोलया रेषांनी कायमच समाजाला योग्य मार्ग दाखविला आहे. असेच प्रभावी मार्गदर्शन व्यंग्यचित्रांनी करावी. वाढत्या वयामुळे आजपर्यंत केलेल्या कार्याची उजळणी करणे हेच आता माझ्या हातात आहे. व्यंग्यचित्रात करण्यासारखे खूप काही आहे. मात्र ते आता मला करता येणार नाही. राज्यात व्यंग्यचित्रांची परंपरा मोठी आहे. ही परंपरा पुढे चालत राहावी, आणि ती तरूणाईंनी चालवावी एवढीच अपेक्षा असल्याचेही शि. द. फडणीस यांनी सांगितले.

‘केसरी’शी ऋणानुबंध 

‘केसरी‘शी माझे जुने ऋणानुबंध आहेत. सह्याद्री मासिकासाठी मी आणि अरविंद गजेंद्रगडकर यांनी ‘हसर्‍या रेषा हसरे शब्द’ हे सदर चालविले आहे. या सदराला राज्यभरातील वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सदर प्रकाशित झाले की, त्यानंतर वाचकांच्या अभिप्राय सुरू व्हायचा. अभिप्रायातून पुढच्या सदराच्या तयारीला नवी ऊर्जा मिळायची. या सदरामुळे मला माझी कला महाराष्ट्रभरात पोहचविता आल्याची आठवणही शि. द. फडणीस यांनी सांगितली. 

शंभरीत पदार्पण करणारे पहिले व्यंग्यचित्रकार 

पुण्यासह राज्याला विविध कलांचा मोठा वारसा लाभला आहे. व्यंग्यचित्रात सर्वोच्च कामगिरी करणारे आणि आपल्या प्रतिभेने व्यंग्यचित्राला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे शि. द. फडणीस हे शंभरीत पदार्पण करणारे राज्यातील एकमेव व्यंग्यचित्रकार आहेत. वयामुळे व्यंग्यचित्रकला थांबली असली, तरी त्याची कल्पकता शाबूत आहे. त्यामुळे शेवटच्या श्वासापर्यंत व्यंग्यचित्रावर प्रेम करत राहणार असल्याची भावना ते व्यक्त करत आहेत. आज ते १०० व्या वर्षात  पदार्पण करत आहेत.

Related Articles