श्रीलंकेचे माजी लष्करप्रमुख निवडणुकीच्या रिंगणात   

कोलंबो : श्रीलंकेचे माजी लष्करप्रमुख सरथ फोन्सेका यांनी भ्रष्टाचाराला चाप लावण्याचा आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा संकल्प करत आगामी  अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपली उमेदवारी जाहीर केली.
 
फोन्सेका म्हणाले, गेली ७६ वर्षे आमचे नेतृत्व एका अकार्यक्षम राजकीय गटाने केले, ज्याने आम्हाला दिवाळखोरीकडे नेले. श्रीलंकेचा विकास करायचा असेल तर भ्रष्टाचाराला चिरडून टाकावे लागेल. उत्पन्न निर्मितीला चालना देण्यासाठी आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्याची गरज आहे. २०२४ च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ही माझी औपचारिक आणि अधिकृत घोषणा आहे.  
 
तमिळ राज्याच्या निर्मितीसाठी एलटीटीईच्या फुटीरतावादी मोहिमेला पराभूत करणारे फोन्सेका २०१० च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विद्यमान महिंदा राजपक्षे यांच्याविरोधात विरोधकांचे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. त्यावेळी त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. श्रीलंकेत राष्ट्रपतिपदाची निवडणूक १७ सप्टेंबर ते १६ ऑटोबर दरम्यान होणार आहे. निवडणुकीची तारीख आज (शुक्रवारी) जाहीर होणार आहे.
 
दरम्यान, ही निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्त्वाची ठरेल, असे राजपक्षे यांनी म्हटले आहे. उमेदवारी जाहीर करताना त्यांनी मंत्रिपदावर कायम राहणार असल्याचे सांगितले. मुख्य विरोधी पक्षनेते सजित प्रेमदासा आणि मार्सवादी झाविप नेते अनुरा कुमार दिसानायके यांनी आपण उमेदवार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. रानिल विक्रमसिंघे हेही पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

Related Articles