योजना फक्त निवडणुकी पुरतीच   

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केली. लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच असल्याचेही पवार म्हणाले.
 
देशाचे नेतृत्व चुकीच्या लोकांच्या हातात आहे, असे सांगत पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षांत आपण पाहिले की, यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात यांचा थोडाही वाटा नाही. सार्वत्रिक निवडणुकीत मोदींनी काय केले, हे संपूर्ण देशाने पाहिले. देशाच्या राज्यघटनेवर घाला घालण्याची तयारी त्यांनी केली होती. राज्यघटनेवर हल्ला करण्याचे काम त्यांनी केले. समाज एकसंघ राहिला पाहिजे हे सूत्र त्यांना मान्य नाही. त्यामुळे यांच्या हातात सत्ता जाणे हे मान्य नाही, असेही पवार यांनी सांगितले.
 
लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवरुनही पवार यांनी सरकारवर टीका केली. सरकारी तिजोरीत काही नाही. या केवळ घोषणा आहेत. निवडणुकीच्यावेळी एखाद दुसरा हप्ता दिला जाईल. तो देऊन जनमानस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न दिसतो; पण नागरिकांमध्ये अशीही ही चर्चा आहे की, या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाही. त्याचा काही ना काही तरी परिणाम होईल, असेही पवार म्हणाले.

Related Articles