सातार्‍यात डेंग्यूचा पहिला बळी   

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यातील वाई शहरात डेंग्यूचा पहिला बळी गेल्याने वाई नगरपालिका प्रशासनाचा डोळेझाकपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. 
 
वाई नगरपालिकेला शहरासाठी स्वतःचे आरोग्य केंद्र उभारता आले नाही. यात्रा निवासमधील यात्रेकरूंच्या खोल्या बंद करून तात्पुरत्या स्वरूपामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा गुपचूप प्रयत्न करण्यात आला खरा, पण त्यावर टाकलेला निधी हा कृष्णामाईच्या पात्रात कधी वाहून गेला हे एकाही वाईकराला आजपर्यंत समजलेले नाही. 
 
नगरपालिका प्रशासनाकडे स्वतंत्र आरोग्य अधिकारी नाही. आरोग्य विभागाचा कारभार कर्मचार्‍यांच्या अंगावर सोपवून अधिकारी केवळ कागदी घोडे नाचवून चौकशीसाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना पद्धतशीरपणे मार्गी लावत आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाने नेमकी काय उपाय योजना केली ती किती अमलात आणली, फॉगिंग किती केले, हे कोणी पाहत नाही. नगरपालिकेच्या तकलादू कारभाराने डेंग्यूच्या डासांनी वाईकरांचे जगणे मुश्किल केले आहे. सरकारी व खासगी दवाखाने डेंग्यूच्या रुग्णांनी भरले आहे, हे वास्तव माहीत असूनही प्रशासन फॉगिंग ठेकेदाराचे लाड पुरवण्यात मशगुल आहे. दोन महिन्यापासून डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले आहे. 

Related Articles