ड्रोनच्या घिरट्या चाचण्यांसाठीच   

अखेर झाला उलगडा

बेल्हे, (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन फिरत असल्याने तालुयातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. चोरी करण्याच्या दृष्टीने टेहळणी करण्यासाठी ड्रोन उडवले जात असल्याची चर्चा होती. मात्र, रात्रीच्या वेळी आकाशात घिरट्या घालणार्‍या ड्रोनचा उलगडा झाला असून, लष्करासाठी ड्रोन बनविणार्‍या कंपनीकडून जुन्नर तालुयात याच्या चाचण्या सुरू असल्याचे समोर आले आहे.
 
आळेफाटा पोलिसांना मुंबईस्थित कंपनीने पाठवलेल्या पत्रामुळे हा प्रकार उघड झाला. ड्रोन उडविण्याच्या परवानगीचे पत्र पोलिस यंत्रणेला मुंबईस्थित आयडीया फोर्ज कंपनीने दिले आहे. ३१ जुलैपर्यंत वडगाव कांदळी भागात ड्रोन उडविण्याची परवानगी या पत्राने कंपनीने पोलिसांकडे मागितली आहे. कंपनीचे कार्यकारी अधिकारी विपुल जोशी यांनी याबाबतचे पत्र आळेफाटा पोलिसांना दिले आहे.
 
आमच्या कंपनीकडून ड्रोन बनविले जातात. त्यांचा वापर लष्करासाठी; तसेच पोलिसांसाठी होतो, असे पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी सांगितले. वडगाव कांदळी भागात ज्या क्षेत्रात या ड्रोनचा वापर केला जाणार आहे, त्या गायरानाचा नकाशा या परवानगी पत्रासोबत जोडण्यात आला आहे.
 

Related Articles