घाट विभागात मुसळधार   

पुण्यात चार दिवस मोठा पाऊस नाही 

पुणे : पुणे जिल्ह्यातील घाट विभागात जोरदार ते मुसळधार पाऊस कायम आहे. मात्र, पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात तसेच शहर आणि उपनगरातील पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. घाट विभागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात मात्र पुढील चार दिवस मोठा पाऊस होणार नसल्याचा अंदाज आहे. पण, राज्यात पुढील चार ते पाच दिवस ठिकठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
गेल्या बुधवारी आणि गुरूवारी शहरासह जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात जोरदार ते मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीपात्रात पाणी सोडावे लागले होते. मात्र, पाणलोट क्षेत्रातील पाऊस कमी झाला असल्याने धरणातून सोडण्यात येणारे पाणी आता कालव्यातून सोडण्यात येत आहे. पुढील चार दिवस शहरात ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. जिल्ह्यातील घाट माथ्यावर पाऊस कायम असल्याने धरणात साठत असलेल्या पाण्यामुळे पाण्याची पातळी वाढत आहे.    
 
त्यामुळे खडकवासला धरणाच्या कालव्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात पाऊस कमी झाला आहे. मात्र, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात पाऊस कायम आहे. शहर आणि उपनगरात काल सकाळपासून अधून-मधून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्री उशीरापर्यंत ढगाळ वातावरण कायम होते. आज (रविवारी) ढगाळ वातावरणासह शहरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 
 
समुद्र सपाटीवर असलेला कमी दाबाचा पट्टा आज दक्षिण गुजरात ते उत्तर कर्नाटक किनारपट्टीपर्यंत कार्यरत आहे. तसेच, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढून त्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र पश्चिम बंगाल व लगतच्या उत्तर ओडिसावर आहे. कोकण, गोव्यात पुढील आठवडाभर, विदर्भात पुढील दोन दिवस बहुतांश ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तुरळक ठिकाणी खूप जोरदार ते जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यात मेघर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शयता आहे. त्यामुळे विदर्भाला ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. 

Related Articles