टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि इंडो कंपास एलएलपीमध्ये सामंजस्य करार   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आणि इंडो कंपास एलएलपी यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील सेंटर फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंट अंतर्गत व्यवसाय सुरू करू इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, तसेच लघु उद्योजकांसाठी विविध कार्यशाळाही राबवल्या जातात. त्यांना व्यवसाय वाढीसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाते. 
 
या सामंजस्य कराराचा मूळ उद्देश हा अन्नप्रक्रिया व्यवसायातील विविध संधीविषयी, तसेच अन्न व्यवसायातील जागृती आणि सुरक्षितता याबद्दल लघु उद्योगांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. खाद्यपदार्थांचा व्यवसाय करत असताना काही गोष्टींचे अनुपालन करावे लागते, त्याबद्दलही या कंपनीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. इंडो कंपास या कंपनीने आतापर्यंत विविध उद्योगांना मार्गदर्शन देत त्यांच्या प्रकल्पांना योग्य ते यश प्राप्त करून दिले आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक आणि प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी इंडो कंपासचे सहसंस्थापक भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (ऋडडअख) चे माजी संचालक कर्नल प्रमोद दहितुले, अन्न प्रक्रिया सुरक्षा आणि पोषण तज्ज्ञ रूपा कानविंदे आणि सेंटर फॉर इनोव्हेशन अँड आंत्रप्रेन्युरशिप डेव्हलपमेंटच्या उद्योग तज्ज्ञ आणि सल्लागार डॉ. मीताली मोरे उपस्थित होत्या.
 
शिक्षणाचे बदलते रूप, अनुभवात्मक शिक्षणाकडे वाढता कल, इंटर्नशिप, रोजगारातील बदलत्या संधी याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. ऑगस्टपासून याबाबत विविध कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिर आणि प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. विद्यार्थी आणि होतकरू उद्योजकांना मार्गदर्शन देण्यासाठी फूड सेफ्टी आणि अवेअरनेस प्रशिक्षण, विविध योजनांविषयी माहिती, फूड इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री मध्ये इंटर्नशिपसाठी मार्गदर्शन केले जाईल, तसेच नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन कौशल्य विकसन करण्यात येईल.
 
इंडो कंपासच्या संस्थापकांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची १०० वर्षाची परंपरा लक्षात घेत एकत्रित काम करून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद केले.

Related Articles