आता जलधोरण हवे   

विशेष : प्रा. मुकुंद गायकवाड

राज्याच्या काही भागात चांगला पाऊस होत आहे, तर काही भागात धरणाची पोटे रिकामी आहेत. सध्या वातावरण कितीही आल्हाददायी असले तरी भूमातेची ओंजळ रिकामी आहे. ओंजळ रिकामी असेल तर आपण ती भरून घेण्याचा प्रयत्न करतोच ना? तसे आताही करायला हवे. चोख जलनियोजनासाठी  आतापासून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
 
गेल्या तीन वर्षांमध्ये देशात कमी पाऊस झाला. या वर्षीही अजून सरासरीपेक्षा कमीच पाऊस झाला आहे. जमिनीखालील  पाणी पातळी कमालीची खालावलेली आहे.कोकण, मुंबई, मराठवाड्याचा काही भाग आणि सोलापूर, परभणी जिल्ह्यात जोरात पाऊस झाला आहे. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. राज्यातील धरणांमध्ये अजूनही पाणीसाठा कमीच आहे. गोसेखुर्द, तापी वगळता राज्यातील उर्वरित नद्यांना अजूनही अपेक्षेइतके पाणी नाही. घोडनदी, गोदावरी, मुळा, प्रवरा आदी नद्यांना पहिले पाणीही गेलेले नाही.
 
पाऊस ढगफुटीसारखा होतो. त्याचे पाणी साठवता येत नाही, तर काही ठिकाणी अजून पाऊसच झालेला नाही. त्यामुळे पाणी साठवायचे कसे, असा मोठा प्रश्‍न आहे. जायकवाडी, उजनी, कोयना ही मोठी धरणे अजूनही भरलेली नाहीत. पाणलोट क्षेत्रनिहाय पडणार्‍या पावसाचा विचार न करता केलेले पीकनियोजनही भूगर्भातील पाण्याच्या मुळावर आले आहे.  कूपनलिका खोदण्याची जणू स्पर्धा लागली आहे. पिके जगवण्यासाठीच्या स्पर्धेत भूगर्भातील पाण्याचा अनिर्बंध उपसा केला जात आहे. त्यावर ना प्रशासनाचे नियंत्रण आहे ना धोरणकर्त्यांचे. या पार्श्‍वभूमीवर  आता पाऊस पडला तसं पाणी वाहून गेलं. . धरणांच्या पाणलोट क्षेत्राप्रमाणेच लाभक्षेत्रातही पाऊस व्हावा लागेल. नदी,  नाले, ओढे, प्रपात तुंडुब भरून वाहावे लागतील.एव्हाना काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसानीच्याही बातम्या येत आहेत. पाऊस कोसळतो तशाच दरडीही कोसळतात. राज्याच्या राजधानीशी संपर्क तुटल्याचे जाहीर होते. शहरांमध्ये पाणी शिरते. लोकांना स्थलांतर करण्याचे इशारे दिले जातात.
 
पाऊस पडत असला, तरी अजूनही शेतीमालाच्या भाववाढीचा आलेख खाली आलेला नाही. राज्यातील पिकाखालचे क्षेत्र या वर्षी वाढणार असल्याने जादा उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे भावही खाली येतील; परंतु हा अंदाज थोडा लवकर मांडल्यासारखी परिस्थिती आहे. पुढचे दोन महिने वेळेवर पाऊस पडावा लागेल. त्यात अंतर पडता कामा नये, तसेच अतिवृष्टीही होता कामा नये. तसे झाले तरच शेतकर्‍यांना जादा उत्पादन घेता येईल आणि ग्राहकांनाही रास्त भावात शेतीमाल मिळेल. अर्थात हा ‘जर तर’चा प्रश्‍न आहे. रिझर्व बँक आणि सरकारनेही पाऊस पडल्याने सुटकेचा काहीसा निश्‍वास टाकला असला, तरी चिंता अजून दूर झालेली नाही.
 
मध्य महाराष्ट्र, कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. चिंचवड, परभणी, सोलापूरसारख्या काही भागात ढगफुटी झाली. पुण्यात मध्यंतरी काही तासात चार इंच पाऊस झाला. मुंबईत तर अवघ्या काही तासांमध्ये 12 इंचाहून अधिक पाऊस झाला. असे असले तरी पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा जिल्ह्यातील धरणे अजून भरली नसल्याने त्यांचे लाभक्षेत्र आणि या धरणांवर अवलंबून असलेली खालची धरणेही पावसाची आणि पुराची वाट पाहत आहेत. खालच्या भागातील धरणे भरली तरच वरच्या भागातील धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी सुटकेचा निश्‍वास टाकतात. त्याचे कारण खालच्या भागातील धरणे रिकामी राहिली, तर 30 सप्टेंबरनंतर समन्यायी पाणीवाटपाच्या नावाखाली वरच्या भागातील धरणे रिकामी केली जातात.    
 
गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक नद्यांच्या पात्रांना पाण्याचा स्पर्शही झाला नव्हता. काहींच्या पात्रांचा वापर तर फक्त जायकवाडी आणि उजनीला पाणी सोडण्यासाठीच झाला होता. नीरा, कर्‍हा, घोडनदी, सीना, मुळा, प्रवरा, गोदावरी आदी नद्या अजूनही कोरड्याच आहेत. पुण्यातून वाहणारी मुळा-मुठा, इंद्रायणी, पवना, कुकडी अशा किती तरी नद्यांमध्ये अपेक्षित पाणी अद्याप यायचे  आहे.  गेले वर्षभर पाणीकपातीशी झुंजणार्‍या या राज्यातील नागरिकांचा पाणीप्रश्‍न अजूनही कायम आहे. कोपरगाव, येवला, मनमाड आणि अशाच काही शहरांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळते. वर्षभर नदी प्रवाही असलेली पाहणार्‍यांना आता ती तीन महिनेही वाहत नाही हे वास्तव आहे.
 
मराठवाडा आणि दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. असे असले तरी तो सर्वदूर सारखा नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाची सरासरी चांगली दिसत असली, तरी गेल्या वर्षी दुष्काळ होता. त्यापेक्षा थोडा बरा पाऊस अद्याप झालेला नाही. कोल्हापूरच्या पंचगंगा व अन्य नद्या भरून वाहिल्या, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस चांगला झाला होता. मध्य प्रदेशामध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे हतनूर धरणाचे दरवाजे उघडावे लागले.
 
कोकणात महाड, रत्नागिरी, पालघर जिल्ह्यात काही गावांचा संपर्क तुटला होता. दर वर्षी तिथे शहरांमध्ये, गावांमध्ये पाणी घुसते. त्यात काहीच नावीन्य नाही. त्यातही या वर्षी मुंबईपेक्षा लगतच्या ठाणे जिल्ह्यात जास्त पाऊस झाला. गेल्या तीन वर्षांमधील दुष्काळामुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न गंभीर झाला होता. या वर्षीच्या पावसाने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न निकाली काढला. तसेच पुण्यासह अन्य काही मोठ्या शहरांमधील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली. असे असले तरी अजूनही संकट पूर्णत: दूर झालेले नाही. आता पाऊस पडत असला तरी शेतकर्‍यांना हिरवा चारा येण्यासाठी आणखी दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.  
 
जलशिवार योजनेमुळे राज्यात ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी परिस्थिती नाही. तीन वर्षांच्या कमी पावसाने भूगर्भातील पाण्याची पातळी आठ-नऊशे फूट खाली गेली आहे. आता भीज पाऊस झाला, तिथे थोडेफार जादा पाणी मुरले असेल, इतकेच. जमिनीखाली पाणी साठण्यास मधून मधून असाच पाऊस पडावा लागेल. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जसा चांगला पाऊस झाला, तसाच तो लाभक्षेत्रातही व्हावा लागेल. एकदाच आणि काही ठिकाणी पाऊस होऊन उपयोग नसतो, तो सर्वदूर असावा लागतो. अतिवृष्टी आणि ओला दुष्काळ परवडला; परंतु कोरडा दुष्काळ नको. चांगला पाऊस होत आहे, असं मानून जलशिवार योजना किंवा पाणी अडवण्याच्या अन्य योजनांकडे दुर्लक्ष होऊ नये, हे ही नमूद करायला हवे.
 

Related Articles