E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
रविवार केसरी
बळीचा बकरा कशासाठी?
Samruddhi Dhayagude
28 Jul 2024
मिडविकेट : कौस्तुभ चाटे
कालपासून भारतीय क्रिकेट संघाचा श्रीलंकेचा दौरा सुरु झाला. टी-20 चे तीन आणि एकदिवसांच्या तीन सामन्यांचा हा अगदीच छोटेखानी दौरा आहे. झिम्बाब्वेनंतर लगेचच भारतीय संघाचा हा दौरा खेळवला जात आहे. अर्थात पुढे बांगलादेश आणि न्यूझीलंडचे सामने होणार आहेत, पाठोपाठ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचे देखील दौरे असतील. क्रिकेटच्या तीनही प्रकारांमध्ये पुढील काही महिने भारतीय संघ व्यग्र असणार आहे. टी-20 विश्वचषक विजयानंतर भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडन निवृत्त झाला आणि त्याची जागा गौतम गंभीरने घेतली. आता गंभीर गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाचा प्रवास सुरु झाला आहे. या दौर्यासाठी निवड झालेल्या संघांमुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यांचा विचार होणे आवश्यक आहे.
आपल्या देशात क्रिकेट हा खेळ राजा आहे, आणि या राजाच्या काही राण्या आहेत, काही आवडत्या राण्या आणि काही नावडत्या देखील. मुंबई, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू या काही पट्टराण्या, बडोदा, सौराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश या काही आवडत्या राण्या तर बाकी काही नावडत्या राण्या आहेत. या नावडत्या राण्यांमध्ये ‘महाराष्ट्र’ ही एक महत्त्वाची नावडती राणी आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी कितीही चांगली कामगिरी केली तरी राष्ट्रीय संघासाठी त्यांचा क्वचितच विचार केला जातो. श्रीलंका दौर्यासाठी संघ निवडताना देखील तसेच काहीसे बघायला मिळाले.
गेल्या 2-3 वर्षांमध्ये ऋतुराज गायकवाडने वेगवेगळ्या प्रकारांमध्ये अनेकदा स्वतःला सिद्ध केले आहे. फर्स्ट क्लास क्रिकेट असो, देशांतर्गत एकदिवसीय अथवा टी-20, भारताचे ‘अ’ संघाचे दौरे असो, आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय अथवा टी-20 सामने असोत, प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःचे नाणे खणखणीत वाजवले आहे. असे असताना देखील तो अजूनही भारताच्या संघात स्थिर नाही, किंबहुना त्याने स्थिर व्हावे म्हणून कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले जात नाही असे वाटते. गेल्या 2 वर्षात तो फक्त 6 एकदिवसीय सामने खेळला आहे आणि 3 वर्षात 23 टी-20 सामने. त्याला मिळालेल्या मोजक्या संधींत त्याने नक्कीच चांगली कामगिरी केली आहे. पण अजूनही त्याला म्हणावी तशी संधी मिळत नाही हे नक्की.
क्रिकेट संघात एकावेळी फक्त 15-17 खेळाडू असतात, मैदानावर अकराच खेळाडू खेळतात वगैरे गोष्टी अगदी बरोबर आहेत पण हीच गोष्ट इतर खेळाडूंना देखील लागू होते ना. आज ऋतुराजचे रेकॉर्डस् त्याच्या इतर सहकार्यांपेक्षा कितीतरी पटीने चांगले आहे तरीही त्याला डावलणे सुरूच आहे. सध्याच्या घडीला तो भारतातील एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. संघाला गरज असेल त्याप्रमाणे तो सांभाळून अथवा आक्रमक फलंदाजी करू शकतो. तो सलामीवीर असून देखील त्याला अनेकदा खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले जाते आणि एवढे असूनही त्याला जर पुरेशी संधी मिळणार नसेल तर निवड समितीचे कार्य योग्य पद्धतीने चालले आहे का हा प्रश्न विचारलाच पाहिजे.
कदाचित त्याचे ’मार्केटिंग’ कुठे कमी पडते आहे का? ’तो इतर खेळाडूंप्रमाणे अंगावर टॅटू काढत नाही, कोणा अभिनेत्रींबरोबर त्याचं नाव घेतलं जात नाही म्हणून त्याला संघात घेत नाहीत का?’ हे प्रश्न एका माजी खेळाडूने उपस्थित केले आहेत. त्याच्या डावलण्याला ’रोटेशन पॉलिसी’ असे गोंडस नाव देऊन निवड समिती मोकळी झाली आहे. मग त्याच रोटेशन पॉलिसीमध्ये इतर खेळाडू, युवा फलंदाज कधी येणार आहेत? कोणताही पूर्वानुभव नसताना, आयपीएल सारख्या स्पर्धेत देखील कर्णधार म्हणून चांगली कामगिरी न करता सुद्धा या खेळाडूंना राष्ट्रीय संघाच्या उपकर्णधारपदी बढती दिली जाते पण आशियाई संघ विजेत्या कर्णधाराला मात्र मुख्य संघातून बाहेर काढलं जातं हा कोणता न्याय आहे? निवड समिती या प्रश्नांची उत्तरे देणार आहे का?
सुमारे 2 वर्षांपूर्वी ऋषभ पंतचा अपघात झाला आणि कालांतराने त्यामधून तो बाहेर देखील आला. त्याचा अपघात दुर्दैवी होता, आणि त्याने बाहेर येण्यासाठी घेतलेले कष्ट नक्कीच स्पृहणीय होते. त्याने खेळायला सुरुवात केल्यानंतर एका आयपीएलच्या जोरावर त्याला मुख्य संघात लगेच स्थान मिळते. अर्थातच हे स्थान त्याच्या जुन्या खेळींमुळे आहे. अपघातातून बाहेर आल्यानंतर आपली निवड समिती त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगत नाही, पण त्याला विश्वचषकाच्या संघात स्थान मिळते. आता कसोटी सामने सुरु झाल्या नंतर देखील तो लगेचच ’प्लेईंग इलेव्हन’ मध्ये असेल. त्याच्या कर्तृत्वावर किंवा क्षमतेवर शंका नाही, पण त्याला एक न्याय आणि इतरांना वेगळा असे का?
त्याच्या अनुपस्थितीत आपण के एल राहूल, ईशान किशन, संजू सॅमसन, जितेश शर्मा, के एस भरत आणि ध्रुव जूरेल सारख्या यष्टिरक्षकांना संधी दिली. पण तो संघात आल्यानंतर तांदळातून खडा बाहेर काढावा तसे आपण राहुलला बाहेर काढले. ईशान किशन काही वेगळ्या कारणांमुळे संघाबाहेर असला तरी त्याची किंवा संजू सॅमसनची परिस्थिती देखील वेगळी नाही. जितेश, भरत आणि जूरेल हे तर नवे खेळाडू आहेत. काहीच महिन्यांपूर्वी इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ध्रुव जूरेलने अप्रतिम खेळ केला होता. पंतच्या आगमनानंतर पुढील कसोटी मालिकेत तो देखील बाहेर जाणार आहे. या प्रश्नांना काही उत्तरे आहेत का?
गौतम गुरुजींनी भारतीय संघाची धुरा हातात घेतल्यापासून काहीसे वेगळेच वारे वाहू लागले आहेत. तो मुळातच फटकळ आहे आणि आक्रमक देखील. अशावेळी त्याचे काही निर्णय चुकीचे वाटू शकतात. त्यात त्याने स्वतःहून पुढाकार घेऊन संघाची धुरा कोणाकडे असावी वगैरे विधाने केल्यानंतर संघाची झालेली निवड नक्कीच प्रश्न निर्माण करते. त्याचे आणि इतर काही खेळाडूंचे पटत नसेलही, पण राष्ट्रीय संघाचा विचार करताना हे मतभेद बाजूला ठेवणे आवश्यक आहे. झिम्बाब्वे दौर्यात चांगली कामगिरी करून देखील अभिषेक शर्मा, ऋतुराज किंवा संजू सॅमसन सारख्या खेळाडूंना जर संघाबाहेर ठेवले जात असेल तर क्रिकेटप्रेमी म्हणून निश्चितच वाईट वाटते. आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर ऋतुराजच्या बाबतीत असे होणे खरेच क्लेशदायक आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या अनेक खेळाडूंना वेळोवेळी डावलले गेले आहे. गेल्या दशकभरात केदार जाधव, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराजच्या निमित्ताने महाराष्ट्राचा खेळाडू अधेमधे संघात दिसत असे, पण गुणवत्ता असूनही जर त्या खेळाडूला संघात जागा मिळणार नसेल तर निवड समिती कशासाठी आहे ते देखील सांगावे.आणि ही खरेच रोटेशन पॉलिसी असेल तर पुढे येणार्या बांगलादेश आणि न्यूझीलंडच्या दौर्यात ऋतुराज गायकवाडचे नाव प्लेइंग इलेव्हनमध्ये असावे एवढीच अपेक्षा आहे. ऋतुराज सारख्या खेळाडूचा बळीचा बकरा बनवणे यामध्ये तुमचे अपयश आहे. संधी मिळाली की तो सोने करेलच, पण तुमच्याकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत का?
Related
Articles
विंडीजच्या संघाचा शानदार विजय
12 Oct 2024
रिझर्व्ह बँकेने कर्ज घेणाऱ्यांना दिली दिवाळी भेट!
09 Oct 2024
वाचक लिहितात
09 Oct 2024
अपघातात पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू
14 Oct 2024
कोथरूड स्टॅन्डसमोर डंपरखाली तरुणीचा मृत्यू
09 Oct 2024
बाजारात डाळिंब ५०० रुपये किलो
09 Oct 2024
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
चिकित्सक विचाराला चालना मिळावी
2
उद्योगपती रतन टाटा यांचे निधन
3
नृत्यकलाकार माळी यांचे गरबा खेळताना निधन
4
वाचक लिहितात
5
आघाडीत बिघाडी? (अग्रलेख)
6
योग्य निवड (अग्रलेख)