मोबाईलचे दर वाढले, सेवांचा दर्जा घसरला   

वृत्तवेध 

या महिन्यात बीएसएनएल वगळता इतर सर्व टेलिकॉम कंपन्यांनी मोबाईलच्या दरामध्ये १०-२५ टयांनी वाढ केली आहे. असे असूनही देशातील सुमारे ८९ टक्के मोबाईल फोन वापरकर्त्यांना कनेटिव्हिटीसह कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत आहे. म्हणजेच दहापैकी नऊजणांना कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत आहे. स्थानिक मंडळांच्या पाहणीत ही बाब समोर आली आहे.
 
तंत्रज्ञानात प्रगती होऊनही मोबाइल कनेटिव्हिटीमध्ये सुधारणा झालेली नाही. हे ‘ट्राय’नेही मान्य केले आहे. ताज्या सर्वेक्षणामध्ये देशातील ३६२ जिल्ह्यांतील लोक सहभागी झाले होते. गेल्या बारा महिन्यांपासून मोबाईल वापरकर्त्यांच्या तक्रारी वाढत आहेत. मोबाईल नेटवर्कबाबत लोकांचे अनुभव जाणून घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यांमध्ये (मार्च ते जून) अखिल भारतीय स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात देशातील ३६२ जिल्ह्यांतील लोकांचा समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के महिला होत्या. सर्वेक्षणानुसार ३८ टक्के वापरकर्ते कॉल ड्रॉपच्या समस्येचा सतत सामना करत होते तर १७ टक्के वापरकर्ते अर्ध्याहून अधिक प्रसंगी कॉल ड्रॉप होत असल्यामुळे त्रासले होते.
 
सर्वेक्षणात केवळ सात टक्के वापरकर्त्यांनी कॉल ड्रॉपची समस्या भेडसावत नसल्याचे सांगितले तर चार टक्के स्पष्ट उत्तर देऊ शकले नाहीत. कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे ९१ टक्के लोकांना सामान्य कॉलऐवजी वाय-फाय किंवा डेटा कॉल करावा लागला. यापैकी १४ टक्के लोक असे होते, ज्यांनी अर्ध्याहून अधिक वेळा इंटरनेट कॉलिंग केले. डेटा कॉल म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, स्काईप यांसारख्या अ‍ॅप्सद्वारे कॉल करणे. सर्वेक्षण अहवाला नुसार कॉल ड्रॉपच्या समस्येमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये अ‍ॅप्सद्वारे वाय-फाय कॉल करणार्‍यांची संख्या वाढली आहे. सर्वेक्षणात केवळ पाच टक्के लोकांनी कॉल आपोआप ड्रॉप होत नाहीत, असे सांगितले. कमकुवत नेटवर्कमुळे कॉल ड्रॉप होण्यासाठी सहसा किती वेळ लागतो, या प्रश्नाच्या उत्तरात, ४१ टक्के लोकांनी आपला कॉल ३० सेकंदांमध्ये आपोआप डिस्कनेट झाल्याचे सांगितले.

Related Articles