अतिवृष्टीमुळे अधिक सतर्क राहा, वीजसुरक्षेची खबरदारी घ्या   

महावितरणचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागात अभूतपूर्व अतिवृष्टीने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय म्हणून वीजपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र पाणी हे विजेचे चांगले वाहक असल्याने पावसाळ्यात प्रामुख्याने रस्त्यावरील विजेचे, पथदिव्यांचे लोखंडी खांब तसेच घरगुती व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वीजयंत्रणेपासून सतर्क राहावे व विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
अतिवृष्टी व संततधार पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, पथदिवे, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्रांचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉस तसेच घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड, विद्युत यंत्रणेजवळील इतर ओलसर वस्तू, साहित्य आदींमुळे विद्युत अपघात होण्याची शयता असते. मुसळधार पावसामुळे झाडे व फांद्या वीजतारांवर पडतात. वीजखांब वाकतात व वीजतारा तुटतात. लोंबकळत राहतात. अशा वीजतारांमध्ये वीजप्रवाह असण्याची शयता असल्याने त्यापासून सावध राहावे. या वीजतारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.
 
बहुतेक इमारतींच्या तळमजल्यावर वीजमीटर बसविलेले आहेत. पावसाळ्यात अनेक इमारतींमध्ये पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे तळमजल्यामध्ये पाणी साचते. वीजमीटरपर्यंत पाण्याची पातळी वाढते. अशी वेळी वीजपुरवठा बंद ठेऊन संभाव्य धोका टाळण्यासाठी संबंधितांनी महावितरणशी तात्काळ संपर्क साधावा. तसेच महावितरणकडून पूरग्रस्त किंवा अतिवृष्टीमुळे पाणी साचलेल्या भागात संभाव्य धोका टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रोहित्रांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येतो. अशा परिस्थितीत वीजग्राहकांनी सहकार्य करावे. वीजविषयक कोणत्याही प्रकारच्या तक्रारींसाठी महावितरणचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक वीजग्राहकांसाठी २४ तास उपलब्ध आहेत. 

Related Articles