राज्यात सर्वत्र पावसाचे थैमान   

मुंबई, (प्रतिनिधी) : दोन दिवसांपासून क्षणाचीही उसंत न घेता कोसळणार्‍या पावसाने गुरूवारी मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’चे बिरूद मिरवणार्‍या पुणे शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाल्याने हाहाकार उडाला आहे. कोकणात मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांनी धोयाची पातळी ओलांडली असून, महाड शहरात पाणी शिरले आहे. सांगली, कोल्हापुरातही स्थिती बिघडत चालली आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज वेधशाळेने वर्तवला असून, आपत्तीला तोंड देण्यासाठी लष्करालाही सज्ज ठेवण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 
दोन आठवड्यांची विश्रांती घेतल्यानंतर शनिवारपासून पावसाने मुंबई, कोकणात ठिय्या मारला होता. बुधवारी पावसाचा जोर वाढला आणि मुंबई, कोकण ठाण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला. मुंबईत काही काळ उपनगरीय रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. मुंबई, ठण्यापेक्षा पुण्यातील स्थिती अधिक गंभीर झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात तळ ठोकून परिस्थितीवर देखरेख ठेवून होते. राज्यातील अनेक नद्यांना पूर आला असून, काही गांवांचा सपर्क तुटला आहे. हवामान खात्याने आज (शुक्रवारी) देखील मुंबई, ठाणे आणि रायगडला रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकार्‍यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसाचा 'रेड अलर्ट' असल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles