कण्हेर धरणातून वेण्णा नदीत पाणी सोडले   

नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 
सातारा, (प्रतिनिधी) : सातारा तालुयातील कण्हेर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे. त्यातच पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी गुरूवारी दुपारी धरणाचे वक्र दरवाजे उचलून ५ हजार यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे वेण्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
 
कण्हेर धरणातून ५ हजार युसेक पाणी वेण्णा नदीत सोडण्यात आले आहे. त्यामुळे म्हसवे पूल करंजेकडून म्हसवे जाणारा तसेच हमदाबाज पूल हमदाबाज कडून किडगावकडे जाणारा या रस्त्यावरुन प्रवास न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बोगदा ते परळी रस्त्यावर भोंदवडे गावाजवळ रस्त्यावरच मोठे झाड पडल्याने काहीकाळ वाहतूक खोळंबली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेत झाड बाजूला केल्यानंतर सुमारे एक्क तासाने वाहतूक सुरळीत झाली.

Related Articles