राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले   

कोल्हापुरात पुराची स्थिती

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे येथे महापूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी राधानगरी धरण भरल्याने धरणाचे ३, ४ व ६ क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले. यातून ५ हजार ७१२ युसेक व विज निर्मिती केंद्रातून १ हजार ५०० युसेक असा एकूण ७ हजार २१२ युसेक इतका विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु करण्यात आला आहे. 
 
गेले सात आठ दिवस पाटबंधारे  विभागाकडून वीज निर्मिती केंद्रातून पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आले. त्यावेळी राधानगरी धरणाचे दरवाजे मागील आठवड्यात उघडले असते तर मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली असती. सद्या राधागनरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.वारणा धरणातून प्रतिसेकंद ८ हजार ८७४ घनफूट, तर दूधगंगा (काळम्मावाडी) धरणातून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी विसर्ग सुरू केल्याने सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. ङ्गपंचगंगा नदीने धोका पातळी गाठली आहे. तब्बल ६५ मार्ग व ८१ बंधार्‍यांवर पाणी आल्याने निम्म्या जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम दूध व भाजीपाल्याच्या आवकवर झाला आहे.
 
काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात जोरदार अतिवृष्टी झाल्याने जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रातून एक हजार यूसेस पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याची वाढ होणार असल्याने या नदीपात्रावरील जवळपास सात बंधारे पाण्याखाली जाण्याची शयता आहे. त्यामुळे दूधगंगा नदी काठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काळम्मावाडी धरण प्रकल्पात ७४.५९ टक्के म्हणजे १८.९४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.

शिवाजी पूल वाहतुकीस बंद

पंचगंगा नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वाघबीळ ते शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. रात्री पोलिसांनी कोल्हापूरच्या बाजूला बॅरिकेडस लावून रस्ता बंद केला. कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गासाठी वाघबीळ, पन्हाळा रस्ता, कासारवाडी, टोप आणि बोरपाडळे, वाठार तर्फ वडगाव असा रस्ता सुरू आहे.

Related Articles