राज ठाकरेंचा स्वबळाचा नारा   

विधानसभेच्या २२५ ते २५० जागा लढवणार 

मुंबई,  (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणार्‍या मनसेने विधानसभा निवडणूक मात्र स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी गुरूवारी पदाधिकार्‍यांच्या मेळाव्यात बोलताना याची घोषणा केली. आपली कोणाशी युती होणार का? आपल्याला कोणत्या जागा मिळतील? असा कोणताही विचार मनात आणू नका. आपण जवळपास २२५ ते २५० जागा लढवणार आहोत. यावेळी काहीही झाले तरी मी मनसेला सत्तेत बसवणार म्हणजे बसवणार, असा निर्धारही राज यांनी यावेळी व्यक्त केला. १ ऑगस्टपासून राज्याचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
राज यांनी काल मुंबईतील रंगशारदा सभागृहात पक्ष पदाधिकार्‍यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेने नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत, यासाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा जाहीर केला होता. त्यांनी लोकसभेची एकही जागा लढवली नाही. पण विधानसभेत सन्मानजनक जागा सोडल्या जातील असे भाजपकडून सांगण्यात येत होते. मात्र, भाजपसोबत न जाता विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचे सूतोवाच राज यांनी केले.
 
युती होईल का? आपल्याला कोणत्या जागा मिळतील? असा कोणताही विचार मनात आणू नका. आपण  जवळपास २२५ ते २५० जागा लढवणार आहोत, असे सांगत राज यांनी स्वबळाचा नारा दिला.

Related Articles