मोदी सरकारची शेतकर्‍यांसोबत सूडभावनेची वागणूक : सुरजेवाला   

नवी दिल्ली : मोदी सरकार शेतकर्‍यांसोबत सूडभावनेने वागत आहे. गेल्या दहा वर्षांत या सरकारने देशातील ७२ कोटी शेतकर्‍यांच्या पाठीवर आणि पोटावर लाथ मारली. नुकताच सादर झालेला अर्थसंकल्पही शेती आणि शेतकरी विरोधी आहे, असा आरोप काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केला.  
 
अर्थसंकल्पावरील चर्चेत सभागृहात सुरजेवाला यांनी ’खुर्ची वाचवा, मित्रपक्ष वाचवा आणि पराभवाचा बदला घ्या’ असा नारा दिला. देशातील शेतकर्‍यांचा आक्रोश, गरिबांची असहाय्यता, बेरोजगार तरुणांची आरोळी सरकार ऐकते का? सत्तेवर असलेले सत्ताधारी जाती-धर्माच्या फाळणीत इतके आंधळे झाले आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 
 
सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही, म्हणून शेतकर्‍यांशी संबंधित मोठ्या योजनांची रक्कम पूर्णपणे खर्च केली जात नाही. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तुम्ही त्यांची रोजीरोटी हिसकावून घेत आहात, सरकार शेतकर्‍यांच्या विरोधात सूडबुद्धीने वागत आहे. सरकार अर्थसंकल्पात शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना जाहीर करते मात्र पैसे खर्च करत नाही. आपल्या मुद्द्याचे समर्थन करताना त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी, शेतकर्‍यांना अल्प मुदतीच्या कर्जावरील व्याज अनुदान, पीक विमा योजना आदी अनेक योजनांची उदाहरणे आकडेवारीसह दिली. देशातील ३५ टक्के शेतकरी अजूनही पंतप्रधान किसान सन्मान निधीपासून वंचित आहे. या अर्थसंकल्पात किसान सन्मान निधीतून आठ हजार कोटी रुपये कपात करण्यात आले आहेत.
 

Related Articles