केजरीवाल, सिसोदिया, कविता यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ   

नवी दिल्ली : कथित उत्पादन शुल्क धोरणाशी  संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात दिल्ली न्यायालयाने गुरुवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. यासोबतच, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के. कविता यांच्या कोठडीतही वाढ केली आहे. विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी याबाबतचे काल आदेश दिले.
 
दिल्लीतील मद्य धोरण प्रकरणाचा अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) यांच्यामार्फत समांतर तपास सुरू आहे. ईडीच्या प्रकरणात केजरीवाल यांना न्यायालयाने ३१ जुलैपर्यंत कोठडी वाढवली. तर, सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांची न्यायालयीन कोठडी ८ ऑगस्टपर्यंत वाढवली.आम आदमी पक्षाचे नेते सिसोदिया आणि कविता यांच्या न्यायालयीन कोठडीतही ३१ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे.याआधी सुनावलेल्या कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. केजरीवाल यांना ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे, ते सध्या ‘तिहार’च्या तुरुंगात बंद आहेत.

Related Articles