दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील आजचा पेपर लांबणीवर   

पुणे : राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आज (शुक्रवारी) अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील आज शुक्रवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्य मंडळाच्या सहसचिव मेधा निरफराके यांनी दिली. 
 
राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा १६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत, तर बारावीची परीक्षा १६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होत आहे. मात्र राज्याच्या विविध भागांमध्ये अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडत आहे. तसेच २६ जुलै रोजी राज्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या दिवशी होणारी दहावीची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग या विषयाची परीक्षा पुढे ढकलून ती ३१ जुलै रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत घेतली जाणार आहे. तर बारावीची वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर २ या विषयांची परीक्षा पुढे ढकलून ती ९ ऑगस्ट रोजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परीक्षेच्या अन्य वेळापत्रकाध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गुरुवारची परीक्षा नियोजनानुसार पार पडली. 
 
पावसामुळे विद्यार्थ्यांना अडचण आल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. तशी मागणी आल्यास संबंधित विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेतला जाईल, असे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

Related Articles