गौतम गंभीरच्या एका वाक्याने निवड समिती बुचकळ्यात   

मुंबई : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-२० प्रकारामधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर भारतीय संघात बर्‍याच घडामोडी घडत चालल्या आहेत. राहुल द्रविडने प्रशिक्षक पद सोडले व गौतम गंभीरची वर्णी लागली. तसेच श्रीलंकाविरुद्धच्या टी-२० मलिकेसाठी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. तर शुभमन गिलकडे टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. 
 
टी-२० च्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याचं नाव निश्चित मानले जात असताना सूर्यकुमार यादवचे नाव जाहीर झाल्याने सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. टी-२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले होते. संपूर्ण स्पर्धेत त्याने फलंदाजीत १४४ धावा आणि गोलंदाजीत ११ विकेट्स घेतल्या. त्यामुळे नेमकं कोणत्या कारणामुळे हार्दिक पांड्याला कर्णधारपदापासून दूर ठेवण्यात आले, याचा एका रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे. 
 
बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, गौतम गंभीरने कर्णधारपदासाठी थेट सूर्यकुमार यादवचे नाव पुढे केले नव्हते. पण कामाच्या ताणामुळे भारतीय संघाच्या यशात अडथळा ठरू नये, असा कर्णधार आपल्याला हवा आहे, असे गौतम गंभीरने स्पष्ट केले होते. अजित आगरकर यांनीही गौतम गंभीरचा पुढीला विचार, त्यामागील कारण समजून घेतलं आणि सूर्यकुमार यादवची कर्णधारपदी निवड केली. निवड समितीची बैठक सुरु असताना अनेक खेळाडूंना फोन केले गेले आणि त्यांना दीर्घकालीन योजनेवर विचारणा करण्यात आली, अशी माहितीही समोर आली आहे.
 
हार्दिक पांड्याला टी-२० संघाचं कर्णधारपद मिळालेले नाही, त्यामुळे त्याच्या टीम इंडियातील स्थानावर प्रश्न उपस्थित होणार आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पांड्या चांगली कामगिरी करू शकला नाही तर काय होईल? गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल दिसणार आहे. पुढील वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार असून श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत हार्दिकने सहभाग न घेतल्याने त्याच्या भवितव्याबाबतही चिंता निर्माण होत आहे.
 
टीम इंडियाच्या कर्णधारपदी निवड झाल्यानंतर सूर्यकुमार यादवे पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सूर्यकुमार यादवने सर्वांचे आभार मानले आहेत. तुमच्या प्रेम, समर्थन आणि शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. गेले काही आठवडे स्वप्नापेक्षा कमी नव्हते आणि मी खरोखर कृतज्ञ आहे. देशासाठी खेळणे ही सर्वात खास भावना आहे जी मी शब्दात सांगू शकणार नाही. या नवीन भूमिकेमुळे खूप जबाबदारी आणि उत्साह आहे मला तुमचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत राहतील अशी आशा आहे, असं सूर्यकुमार यादव म्हणाला. 
 

Related Articles