साप्ताहिक भविष्य

२ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर २०२२

मेष

Mesh

अनपेक्षित धनलाभ 

सांसारिक जीवनातील ताण तणाव टाळण्यासाठी महिलांनी हट्टीपणा सोडून तडजोडीची तयारी ठेवावी. समजुतदारपणाने अनेक समस्या दूर होतील. नोकरीत  स्थान कायम राखण्यासाठी आणि  प्रतिमा जपण्यासाठी चाणाक्षपणा उपयोगी पडेल. मानापमानाच्या भावना तीव्र राहिल्या तरी त्यात गुंतून राहू नये. नोकरीत एखाद्या अपयशाचा सामना करायला लागू शकतो. उत्तरार्धात व्यावसायिक जीवनात आर्थिक नुकसानीची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्याची आवश्यकता रहील. काही जणांना अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे.

वृषभ

vrishabh

सुसंगत दिशादर्शक राहील 

सप्ताहाचा आरंभ कुटुंब सुखाचा आणि ऐहिक सुखांचा आहे. नोकरी आणि उद्योगात कामाचे ताण वाढले तरी आर्थिक प्रगतीचे संकेत लाभल्याने उत्साह वाढेल. सुसंगतीने नव्या दिशा गवसतील. मंगळवारी प्रेमाच्या व्यक्तीचे रुसवेफुगवे काढावे लागतील. शनी मंगळ वादविवादाचे वातावरण निर्माण करतील. सारासार विचाराने आणि तारतम्याने असे प्रसंग टाळता येतील. आग्रही वृत्ती सोडल्यास नोकरीत सहकार्‍यांची मदत लाभेल. उत्तरार्ध बौद्धिक क्षेत्रात आणि शिक्षण क्षेत्रात प्रगतीकारक आहे तर सप्ताहाच्या शेवटी अंतर्मानाचा कौल लाभेल.

मिथुन

mithun

 भावनांचा अतिरेक टाळा

व्यावसायिक जीवनातील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रयत्नपूर्वक त्यातून मार्ग निघू शकतो. घरगुती जीवनात सुसंवाद होतील. आपुलकीने नाती अधिक दृढ होतील.  मंगळवार सांसारिक जीवनात सुख वाढवणारा आहे.बुधवार मात्र कलह, वादविवाद आणि मतभेदातून मनस्ताप देणारा आहे. उत्तरार्धात आरोग्याबाबत दक्षता बाळगा. जोखमीची कृत्ये टाळल्यास शारीरिक दुखापती टळतील. सप्ताहाचा शेवट कौटुंबिक समाधानाचा असला तरी भावनांचा अतिरेक टाळणे आवश्यक आहे. 

कर्क

kark

प्रेम नात्यातील ओढ वाढवेल

नोकरीत प्रतिष्ठा वाढवणार्‍या घडामोडी घडतील. पर्यटन, सौंदर्य संगोपन, सजावट आणि रचना अशा प्रकारच्या व्यवसायात अपेक्षित धनलाभ होतील. कौटुंबिक जीवनात प्रेम आणि भावूकता नात्यातील ओढ वाढवतील. मंगळवार कलाकारांना प्रगतीकारक आणि अनोख्या संधी देणारा राहील. मंगळ भ्रमण मान सन्मान वाढवणारे आणि यश दायकआहे. गैरसमज टाळण्यासाठी पतीपत्नींनी एकमेकाची प्रतिष्ठा जपणे आणि एकमेकासंबंधी आदर भावना दाखविणे आवश्यक आहे. सप्ताहाचा शेवट दूरच्या प्रवासाची संधी देणारा आणि व्यावसायिक उद्दिष्टपूर्तीचा आनंद देणारा आहे.

सिंह

sinha

प्रयत्नांना यश लाभेल 

अष्टमातील गुरु आणि द्वितीय स्थानातील शुक्र सुखांचा हव्यास वाढवणारा आणि ऐहिक आकर्षणाच्या मागे धावायला लावणारे आहेत. सुविचारातून मानसिक स्थैर्य लाभेल. नोकरी आणि व्यवसायात प्रयत्नांना यश लाभेल तसेच आर्थिक प्रगतीचे संकेत लाभतील. बुध आणि शुक्र कलाकारांना प्रेरणा देणारे आणि अपेक्षित धनलाभ करून देणारे आहेत.  शनी भ्रमण विविध क्षेत्रातील विरोधाची धार कमी करून व्यावसायिक स्थैर्याकडे वाटचाल करण्यास मदत करेल. उत्तरार्ध कर्तृत्वाचा,आर्थिक घडामोडी वाढवणारा तर सप्ताहाचा शेवट आरोग्य दक्ष रहायला लावणारा आहे.

कन्या

kanya

कलाकारांना प्रसिद्धीचे वलय

सप्तमातील गुरु आणि राशीतील शुक्र कौटुंबिक आनंद प्रसंगांची अनुभूती देणारे आहेत. घरगुती समारंभ लगबग वाढवतील. सुख आणि समाधान वाढेल. नाटक, चित्रपट किंवा अभिनय अशा क्षेत्रातील कलाकारांना प्रसिद्धीच्या वलयात आणतील. नोकरी किंवा व्यापार यातील महत्वाचे निर्णय पुन्हा तपासून पाहण्याची गरज भासेल. विशेषतः बुधवारी आणि गुरुवारी चुकीच्या निर्णयाने एखाद्या अपयशाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. उत्तरार्ध सार्वजनिक क्षेत्रातील नोकरदारांना अनुकूल आहे तर सप्ताहाचा शेवट सहजीवनाचा आनंद देणारा आहे. 

तूळ

tula

विवेक बुद्धी वापरा    

व्यय स्थानातील शुक्र आणि षष्ठ स्थानातील गुरु चैनीचे आकर्षण वाढवून आरोग्यावरील ताण वाढवणारे आहेत. व्यसनाधीनतेला मर्यादा घालणे योग्य ठरेल. बुध आणि हर्षल लहरीपणा वाढवून उद्दिष्टांपासून दूर नेतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहिले तरी अनावश्यक खर्च वाढतील. शनी आणि मंगळ  प्रिय जनांशी मतभेद वाढवणारे आणि ज्येष्ठांना शारीरिक दुखापत करणारे ठरण्याची शक्यता आहे. विवेक बुद्धीने अप्रिय प्रसंग टाळता येऊ शकतात. सप्ताहाच्या शेवटी भावुकतेचा अतिरेक करणारे प्रसंग येण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक

vrishchik

आप्तांच्या आनंददायक भेटीगाठी 

कुटुंबात आनंदप्रसंगांची रिमझिम चालूच राहील. संततीच्या प्रगतीचे आणि कर्तृत्वाचे समाधान राहील. मंगलकार्यांची लगबग वाढेल. आप्त स्वकीयांच्या भेटीगाठी आनंद देतील. व्यावसायिक जीवनातील आर्थिक प्रगती प्रेराणादायक ठरेल. शनी भ्रमण नोकरदारांना उद्दिष्टपूर्तीचा आनंद देईल. सहकार्‍यांच्या मदतीने दैनंदिन जीवनात सहजता येईल.  आग्रही वृत्तीवर मात्र नियंत्रण ठेवायला हवे. सहजीवनातील समजूतदारपणा सुखी जीवनात सातत्य राखेल. सप्ताहाच्या शेवटी कौटुंबिक सुख भावनिक स्थैर्य देईल. नवे मित्र लाभतील.

धनु

dhanu

भावनिक गुंतागुंत वाढेल

सप्ताहाचा प्रारंभ विविध क्षेत्रात कोंडी सदृश वातावरण निर्माण करेल. प्रयत्नपूर्वक प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढावा लागेल. विविध प्रसंगात बुद्धी कौशल्य सिद्ध कराल. आर्थिक शिस्त पाळल्यास व्यापारी आणि व्यावसायिकांना मंगळवारी होणारी  नुकसानीची शक्यता टाळता येईल. विरोधक सक्रिय राहिले तरी तुमची बाजू वरचढ राहील. शनी भ्रमण नोकरीतील अडचणी वाढवेल. उत्तरार्धात  नोकरदारांना आर्थिक स्थैर्य लाभेल. सप्ताहाच्या शेवटी बुद्धी आणि भावना यातून वैचारिक गुंतागुंत वाढेल.

मकर

makar

वृत्ती आत्मकेंद्रित राहील

धार्मिक जीवनातील गैरसमज टाळण्यासाठी श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक स्पष्ट होणे आवश्यक आहे.  परोपकारांचे उदात्तीकरण टाळा. सार्वजनिक जीवनातील उपक्रमात अनपेक्षित अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. यश प्राप्तीसाठी योग्य मार्गक्रमण करण्यासाठी वैचारिक स्पष्टता यायला हवी. मंगळ भ्रमण उतावळेपणा वाढवेल तर शनी भ्रमण आत्मकेंद्रित वृत्ती ठेवेल. उत्तरार्धात उत्साहाने कार्यरत रहाल. नोकरदारांना बुद्धी कौशल्य वापरण्याची संधी लाभली तरी ते दैनंदिन जीवनात प्रगतीकारक ठरण्याची शक्यता कमी आहे.   

कुंभ

kumbh

नावलौकिक वाढेल.  

कला, साहित्य, जाहिरात किंवा पत्रकारिता अशा क्षेत्रात आर्थिक प्रगतीचे संकेत लाभतील. नवनिर्मितीने संबंधित क्षेत्रात नावलौकिक वाढेल. मंगळवारी ऐहिक सुखांचा पाठपुरावा करत राहिल्याने दैनंदिन उपक्रमात दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.  हट्टीपणाने घरगुती वातावरण तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे. उतावळेपणाने केलेल्या खर्चाचे तसेच घाईने घेतलेल्या निर्णयांचे पर्यवसान आर्थिक नुकसानीत होऊ शकते. उत्तरार्धात अविचाराने अडचणीत आलात तरी आर्थिक आणि कौटुंबिक आघाडीवर स्वस्थ रहाल. 

मीन

meen

कर्तृत्वाला प्रोत्साहन 

राशीतील गुरु आणि सप्तमातील शुक्र घरगुती वातावरणातील असमाधान वाढवतील. पत्नीचे हट्ट तुमच्या दैनंदिनीत बाधा आणत राहतील. चर्चेने समस्या सुटू शकतात. बुध आणि हर्षल एकीकडे लहरीपणाने खर्च करवतील तर दुसरीकडे केलेल्या खरेदीच्या आनंदापासून दूरच ठेवतील. मंगळवारी पत्नीची नाराजी दूर करताना तुमची त्रेधा उडेल. व्यावसायिक जीवनात महिला मनस्ताप देतील.  शनी आणि मंगळ   कर्तृत्वाची आघाडी सांभाळतील. सन्मान देणार्‍या आणि प्रतिष्ठा वाढवणार्‍या घटना घडवतील. सप्ताहाच्या शेवटी महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घेण्याची जरूर आहे.