एखाद्या विश्वस्त संस्थेने अखंडपणे 139 वर्षे चालवलेले ‘केसरी’ हे सार्या भारतातील एकमेव वृत्तपत्र आहे. ‘केसरी’ची ही खडतर पण व्रतस्थ वाटचाल, भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवावी, अशी आहे. ही केवळ एका मराठी वृत्तपत्राच्या कामगिरीची कहाणी नव्हे तर हा भारताच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पुनर्जीवनाचा 139 वर्षांचा इतिहास आहे. लोकमान्यांचा केसरी तीन शतकांचा साक्षीदार राहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वराज्याचे आणि स्वातंत्र्योत्तर काळात सुराज्याचे ध्येय घेऊन केसरीने ही वाटचाल केली आहे. स्वातंत्र्यचळवळीं‡बरोबरच मराठी माणसाच्या जीवनाचे असे एकही अंग नाही, की ज्यावर केसरीने या काळात आपला प्रभाव पाडला नाही. राजकारण, समाजकारण, साहित्य, तत्त्वज्ञान, क्रीडा, विज्ञान, करमणूक, शिक्षण, शेती, उद्योग इत्यादी विविध क्षेत्रांत केसरीने आपला ठसा उमटवला आहे.
केसरीचे हे कार्य केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नव्हते. लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यचळवळीत झोपी गेलेल्या समाजाला जागे करण्याचे ते एक शस्त्र होते. केसरीचे थोरले भावंड ‘मराठा’ हा इंग्रजीतून लोकमान्य टिळकांचे व केसरीकारांचे विचार भारतात सर्वदूर पोहोचवत होता. त्यामुळे इंग्रजांविरुद्ध उभ्या राहिलेल्या विराट जनआंदोलनात केसरी आघाडीवर राहिला. एवढेच नव्हे तर स्वातंत्र्यचळवळीचा तो प्रतीक बनला.
निबंधमालाकार विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर या तीन सहकार्यांनी महादेव बल्लाळ नामजोशी, वामन शि. आपटे आणि गणेश कृ. गर्दे यांच्या साहाय्याने रविवार दि. 2 जानेवारी 1881 ला ‘मराठा’ हे इंग्रजीतून आणि मंगळवार दि. 4 जानेवारी 1881 रोजी ‘केसरी’ ही दोन पत्रे काही विशिष्ट हेतूने सुरू केली.
स्वराज्य मिळविण्यासाठी सामान्य जनतेला जागे करण्याचे, तिच्या विचारांना नवी दिशा देण्याचे आणि त्यासाठी उभारलेल्या आंदोलनांना, तसेच हाती घेतलेल्या विविध कार्यक्रमांना हातभार लावण्याच्या द़ृष्टीने लोकमान्य टिळकांनी केसरीचा उपयोग केला. त्यांनी काँग्रेेसला व देशाला दिलेल्या स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण या चतु:सूत्री कार्यक्रमाचा केसरीने हिरिरीने पुरस्कार केला. किंबहुना हीच चतु:सूत्री स्वातंत्र्य मिळाल्यावरही केसरीचे धोरण बनली.
केसरीच्या निर्भीड व नि:पक्षपाती लिखाणाचा परिणाम म्हणून केसरीला अनेक खटल्यांना तोंड द्यावे लागले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्ताधार्यांचा आणि स्वातंत्र्यानंतरदेखील मदधुंद सत्ताधार्यांचा रोष केसरीने लोकहितासाठी पत्करला. केसरीला अनेक वेळा जामीन द्यावे लागले, तर केसरीच्या संपादकांना कारावास भोगावा लागला. देशहितासाठी केलेल्या त्यागाची एक मोठी परंपराच केसरीला लाभली आहे.
परकीय सत्तेविरुद्ध बुलंद आवाज उठविणारा आणि आपल्या त्या गर्जनेने इंग्रजांना गर्भगळीत करणारा ‘केसरी’ हा आपल्या उज्ज्वल संपादकीय परंपरेने, राष्ट्राचा अमोल ठेवा ठरलेला आहे. केसरीचे सुरुवातीचे संपादक गोपाळ गणेश आगरकर हे सुधारणावादी मताचे होते, तर नंतरचे संपादक स्वत: लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते. लोकमानसात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचे अतिशय अवघड परंतु अत्यावश्यक कार्य त्यांनी केले. लोकमान्यांच्या निधनानंतर संपादकपदाची धुरा साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि त्यांच्यानंतर काकासाहेब खाडिलकरांनी समर्थपणे वाहिली. खाडिलकरांनंतर तात्यासाहेब करंदीकर, वा. कृ. भावे, बाबूराव गोखले या थोर विद्वानांकडे संपादकपद आले होते, तर त्यानंतर केसरीचे संपादक झाले गजाननराव केतकर. अतिशय व्यासंगी व कर्तव्यदक्ष संपादक म्हणून मान्यता पावलेल्या केतकरांचा श्रीमत् भगवद्गीतेचा सूक्ष्म अभ्यास त्यांच्या अग्रलेखांतून प्रकट होत असे. गजाननरावांनंतर लोकमान्यांचे नातू जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले. त्यांच्या कारकीर्दीत केसरी अनेकांगांनी परिवर्तित तर झालाच; परंतु तो दैनिकही झाला. चंद्रकांत घोरपडे, डॉ. शरच्चंद्र गोखले हे दोन आपल्या क्षेत्रांत नावाजलेले दिग्गज नंतर केसरीचे संपादक झाले. अभ्यासू व सामाजिक जाण असलेल्या या दोन्ही संपादकांनी केसरी खूपच गाजविला. डॉ. गोखल्यांनंतर अरविंद गोखले यांनी केसरीचे हे शिवधनुष्य समर्थपणे पेलले. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या आपल्या सूक्ष्म अभ्यासाने त्यांनी केसरी ‘वाचकप्रिय’ केला.
डॉ. दीपक टिळक हे केसरीचे विद्यमान संपादक आहेत. संपादकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि व्यवस्थापकीय अशा क्षेत्रांमध्ये त्यांचा अधिकार निर्विवाद असून, काळानुरूप केसरीच्या विविध आवृत्त्या काढून, त्या त्या क्षेत्रांतील वाचकांमध्ये त्यांनी केसरी लोकप्रिय केला; या शिवाय त्यांनी अत्याधुनिक दूरदर्शन आवृत्त़ी, इंटरनेट आवृत्ती इत्यादी बदल केल्यामुळे, आता केसरी या सर्वच क्षेत्रांमध्ये दिमाखाने आणि मुक्तपणे विहार करीत आहे.
लोकमान्य टिळकांच्या हयातीत ‘केसरी’ हे दर मंगळवारी प्रसिद्ध होणारे सा़प्ताहिक होते. 3 ऑगस्ट 1929 पासून केळकरांनी ‘केसरी’ द्विसाप्ताहिक बनवला. आठवड्यातून तो दोन वेळा, दर मंगळवारी आणि शुक्रवारी- प्रसिद्ध होऊ लागला. 2 जानेवारी 1951 पासून ‘केसरी’ त्रिसा़प्ताहिक झाला. दर मंगळवारी, शुक्रवारी आणि रविवारी ‘केसरी’ प्रसिद्ध होत असे. केसरीचा हा काळाबरोबर धावण्याचा स्तुत्य प्रयत्न होता.
‘केसरी’ हे केवळ वृत्तपत्र नव्हे, तर ती एक वैचारिक चळवळ आहे. जसे मोठ्या कारखान्यात यंत्रातील ‘फ्लायव्हील’ला गती मिळाली की अनेक छोटीछोटी चाके फिरू लागतात, तसे टिळकांनी गती दिलेल्या या ‘केसरी’च्या फ्लायव्हीलने शुद्ध पंचांग समिती, रायगड स्मारक मंडळ, अनाथ हिंदू महिलाश्रम, वक्तृत्वोत्तेजक सभा, वसंत व्याख्यानमाला, मराठा चेंबर ऑफ कामर्स व त्यातून निर्माण झालेली बँक आफ महाराष्ट्र, महाराष्ट्र मंडळ, बॄहन्महाराष्ट्र परिषद, टिळक स्मारक मंदिर, टिळक हॉल, श्री शिवाजी मंदिर, पूना ज्यूदो असोसिएशन, रोझ सोसायटी, वेदशास्त्रोत्तेजक सभा, टिळक पर्स फंड, टिळक पुण्यतिथी मंडळ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, जंगल लव्हर्स असोसिएशन, वीर सावरकर स्मारक ट्रस्ट, ले. कर्नल देवधर ट्रस्ट, महिला पुनर्वसन केंद्र, पुणे ऐतिहासिक वास्तुस्मृती… अशा अनेक संस्थांची स्थापना केली. काही संस्थांना तसेच काही व्यक्तींना साहाय्य दिले व त्यांच्या कार्यात मदत केली. ‘अनेकशीर्ष पुरुष अनेकाक्ष अनेकपाद’ हे वर्णन ‘केसरी’स त्यामुळेच यथार्थपणे लागू पडते.
केसरी करंडक, ज्यूदो असोसिएशन, शिवाजी मंदिर इत्यादींच्या माध्यमांतून क्रीडा क्षेत्रातदेखील केसरी सतत क्रियाशील व आघाडीवर राहिला आहे.
‘केसरी’तून पुरस्कारिलेल्या सहकारी चळवळीने गरीब महाराष्ट्राच्या उद्योगीकरणासाठी पडलेली भांडवलाची कमतरता भरून निघाली व ‘केसरी’तील ल. ब. भोपटकर, धनंजयराव गाडगीळ व दा. वि. गोखले यांच्या मार्गदर्शनाने सहकारी चळवळ महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांत पोहोचली. ग्रामीण भागाच्या विकासात तिने आज सिंहाचा वाटा उचलला आहे. आजचे महाराष्ट्रातील साखर कारखाने व त्या साखर कारखान्यांचा समॄद्ध परिसर हा धनंजयरावांच्या सहकारी तत्त्वज्ञानाचे फळ आहे. केळकरांच्या साहित्यसेवेने साहित्याच्या प्रांतात सविकल्प समाधीची मोहोर उठवली गेली, तशी करंदीकर-केतकरांच्या गीताभ्यासाने प्रचारलेली कर्मयोगाची शिकवणही महाराष्ट्रास जागता व जिवंत ठेवण्यास उपयुक्त ठरली. देशातील शेवटचा स्वातंत्र्यलढा जयंतराव टिळकांनी केलेल्या गोवे-विमोचन समितीच्या संघटनेमुळे लढला गेला, तसा पुरोगामी व बुद्धिप्रामाण्यवादी विचारांचा वारसा केळकर, धनंजयराव गाडगीळ यांच्यामुळेच ‘केसरी’च्या वतीने महाराष्ट्रात पुढे चालला.
लोकमान्य टिळकांनी केसरीच्या स्थापनेपासून सन 1881 ते 1920 पर्यंत अखंडपणे चाळीस वर्षे केसरीची धुरा प्राणपणाने सांभाळली.
काही वर्षांचा काळ सोडला तर नंतरच्या काळात लोकमान्यांचे नातू कै. ग. वि. केतकर यांनी प्रथम सन 1928 आणि नंतर सन 1937 ते जून 1950 पर्यंत म्हणजे सुमारे 14 वर्षे संपादक व विश्वस्त म्हणून केसरीला वाहून घेतले होते.
त्यानंतर लोकमान्यांचे नातू कै. जयंतराव श्रीधर टिळक यांनी अत्यंत धडाडीने व समर्थपणे 1950 ते 1980 पर्यंत विश्वस्त/संपादक म्हणून आणि त्यानंतर एप्रिल 2001 पर्यंत आयुष्यभर विश्वस्त म्हणून सुमारे एकावन्न वर्षे केसरीची निरलस सेवा केली.
कै. सौ. इंदुताई टिळक यांनी देखील 1970 ते 1980 या काळात सुरुवातीस रविवार केसरीचा बालविभाग, ‘बाल सह्याद्री’ व नंतर ‘सह्याद्रि’ मासिकाची धुरा सांभाळली.
त्याच सुमारास सन 1952 ते 1975 या कालखंडात जयंतरावांचे धाकटे बंधू- लोकमान्यांचे दुसरे नातू- कै. श्रीकांत श्रीधर टिळक यांनी केसरीचा संपूर्ण छपाई व यंत्र विभाग अत्यंत जबाबदारीने समर्थपणे सांभाळला होता.
तद्नंतर लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक हे सन 1983 पासून आजतागायत केसरीचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक तेवीस वर्षांच्या या कालखंडापूर्वीपासूनच ते सरव्यवस्थापक म्हणून ट्रस्टची सर्व जबाबदारी सांभाळीत आहेत. डिसेंबर 2001 पासून तर विश्वस्त पदाबरोबरच ते केसरीचे संपादक या नात्याने दुहेरी जबाबदारी पार पाडीत आहेत. शिवाय सन 2004 पासून ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवीत आहेत. त्याच बरोबर टिळक स्मारक ट्रस्ट, श्री शिवाजी मंदिर संस्था, वसंत व्याख्यानमाला* यांसारख्या केसरीशी संलग्न असलेल्या अनेक संस्थांना त्यांचे बहुमोल योगदान प्राप्त होत आहे.
त्यानंतर लोकमान्यांचे नातू कै. जयंतराव श्रीधर टिळक यांनी अत्यंत धडाडीने व समर्थपणे 1950 ते 1980 पर्यंत विश्वस्त/संपादक म्हणून आणि त्यानंतर एप्रिल 2001 पर्यंत आयुष्यभर विश्वस्त म्हणून सुमारे एकावन्न वर्षे केसरीची निरलस सेवा केली.
कै. सौ. इंदुताई टिळक यांनी देखील 1970 ते 1980 या काळात सुरुवातीस रविवार केसरीचा बालविभाग, ‘बाल सह्याद्री’ व नंतर ‘सह्याद्रि’ मासिकाची धुरा सांभाळली.
त्याच सुमारास सन 1952 ते 1975 या कालखंडात जयंतरावांचे धाकटे बंधू- लोकमान्यांचे दुसरे नातू- कै. श्रीकांत श्रीधर टिळक यांनी केसरीचा संपूर्ण छपाई व यंत्र विभाग अत्यंत जबाबदारीने समर्थपणे सांभाळला होता.
तद्नंतर लोकमान्यांचे पणतू डॉ. दीपक जयंत टिळक हे सन 1983 पासून आजतागायत केसरीचे विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत. वास्तविक तेवीस वर्षांच्या या कालखंडापूर्वीपासूनच ते सरव्यवस्थापक म्हणून ट्रस्टची सर्व जबाबदारी सांभाळीत आहेत. डिसेंबर 2001 पासून तर विश्वस्त पदाबरोबरच ते केसरीचे संपादक या नात्याने दुहेरी जबाबदारी पार पाडीत आहेत. शिवाय सन 2004 पासून ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरुपद भूषवीत आहेत. त्याच बरोबर टिळक स्मारक ट्रस्ट, श्री शिवाजी मंदिर संस्था, वसंत व्याख्यानमाला* यांसारख्या केसरीशी संलग्न असलेल्या अनेक संस्थांना त्यांचे बहुमोल योगदान प्राप्त होत आहे.
आज लोकमान्य टिळकांची पाचवी पिढी केसरी चळवळीत सामील झाली आहे. डॉ. रोहीत दी. टिळक, डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणती रो. टिळक विविध जबाबदार्या सांभाळत आहेत. डॉ. गीताली टिळक या छावा या लहान मुलांकरिता सुरू केलेल्या साप्ताहिकाच्या संपादकत्वाची जबाबदारी सांभाळत आहेत.