राशिभविष्य दि. २५ मे  ते ३१ मे 
 
आगामी ग्रहयोग : गिरीश कुलकर्णी 
 
कलाभिरुची वाढवणारी युती
 
ग्रह मालेत रवी आणि बुध हे एकमेकांच्या जवळ असणारे ग्रह आहेत.  खगोल शास्त्राप्रमाणे रवी आणि बुध हे एकमेकांपासून जास्तीत जास्त २८ अंश दूर जाऊ शकतात. त्यामुळे रवी आणि बुध यांच्यात फक्त युती योगच होऊ शकतो. रवीच्या सान्निध्यात एखादा ग्रह आला तर तो रविमुळे तेजोहीन  म्हणजेच  अस्तंगत होतो. त्यामुळे रवीच्या पुढे असणारा बुध युती योगात उत्तम फलिते देऊ शकतो. रवी आणि बुध यांची युती विद्याव्यासंगी, बौद्धिक छंद असणारे तसेच ज्ञानासाठी ज्ञान मिळविणारे व्यक्तिमत्व निर्माण करतो. उत्तम आकलनशक्ती असणार्‍या या व्यक्तींना खगोलशास्त्र, गणित, बुद्धिबळ यांचा छंद असतो. उत्तम स्मरणशक्ती, समयसूचकता किंवा वक्तृत्व हे गुण जात्याच या व्यक्तींच्या ठायी असतात. रवी-बुध युती शनी किंवा मंगळ यांच्याशी संबंधित असल्यास मात्र हटवादीपणा, दुराग्रह, कुटिल आचरण किंवा गूढ स्वभाव असे काही दुर्गुण देखील निर्माण करू शकते. या सप्ताहात  रवी-बुध युती वृषभ या शुक्राच्या राशीत होत आहे. त्यामुळे एखाद्या कलेचा अविष्कार या युतीवर जन्माला येणार्‍या व्यक्तीमध्ये प्रकर्षाने दिसू शकतो. सप्ताहात कर्क, कन्या, मकर आणि मीन या राशींना वाढत्या साहित्य रुचीतून या युतीचा प्रत्यय येईल त्यांच्याकाही राशी त्यांच्या व्यवहार कुशलतेचे उत्तम प्रदर्शन करतील. इतर राशींना फारसे ठळक अनुभव येणार नाहीत.
 
मेष-सरकारी कामांना विलंब 
 
बौद्धिक क्षेत्रात आर्थिक प्रगतीचे पर्याय उपलब्ध होतील. कौटुंबिक जीवनात भरमसाठ खर्च होण्याची शक्यता आहे. अमावस्या कौटुंबिक गैरसमज निर्माण करणारी आहे. व्यवहारात आपली कोणी फसवणूक करणार नाही याची खबरदारी घ्या. जवळचे नातेवाईक तुमच्या संसारात अनावश्यक दखल देतील. जवळच्या प्रवासाचे योग आले तरी प्रवासात दगदग होईल. उत्तरार्ध अनारोग्यकारक आहे. कोर्टाच्या कामांना किंवा सरकारी कामांना विलंब होतील. सप्ताहाच्या शेवटी सरकारी अधिकार्‍यांशी हुज्जत घालणे टाळा.
 
वृषभ-आत्मविश्वास वाढेल
 
स्वतःची मते आणि स्वतःचे निर्णय इतरांच्या बोलण्याने प्रभावित होऊ देऊ नका. योग्य संगत योग्य निर्णय घेण्यासाठी उपयोगी पडेल. तुमच्या राशीत होणारी अमावस्या मानसिक संतुलन डळमळीत करण्याची शक्यता आहे. उत्साहाच्या भरात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. द्वितीय स्थानातील गुरु आत्मविश्वास वाढविणारा तसेच विविध कार्यात यश देणारा आहे. प्रशंसायोग्य कर्तृत्वातून नोकरदारांना सन्मान प्राप्ती होईल. उत्तरार्धात आपल्या कार्यात्तील विरोधकांचे अडथळे दूर होतील. सप्ताहांती परिश्रमाने उद्दिष्टपूर्ती शक्य आहे.
 
मिथुन-चिंता आणि नैराश्याचा प्रभाव 
 
राशीस्वमी बुधाचे व्यय स्थानातील भ्रमण ऊर्जा आणि उत्साहाचा अभाव दर्शविणारे आहे. एकाग्रतेअभावी नोकरदारांना उपक्रमात अपयशाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. राशीस्वामीच्या सान्निध्यात होणारा व्यय स्थानातील अमावास्या योग चिंता आणि नैराश्य यांचा प्रभाव करणारा आहे. अपव्ययातून आर्थिक नुकसान संभवते. बौद्धिक क्षेत्र, वित्त क्षेत्र अशा क्षेत्रात वरिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या अंती आप्तेष्टांच्या नाराजीचा सामना करावा लागेल. ज्येष्ठांना उदर पिडेची शक्यता आहे.
 
कर्क-व्यवसायिक जीवनात सुवार्ता 
 
उथळ विचाराने आव्हाने स्वीकाराण्यापेक्षा वास्तवाचा अंदाज घेऊन निर्णय घेणे योग्य ठरेल. नवे मित्र जोडले जातील. त्यांच्या संगतीत आनंद लाभेल. बुद्धीजीवी वर्ग आर्थिक प्रगती करेल. काही जणांना व्यवसायिक  सुवार्ता लाभतील. वरिष्ठांच्या पाठिंब्यावर नोकरदार प्रगतीपथावर राहतील. व्यय स्थानातील गुरु भ्रमण स्थावर चिंता लावेल. एखाद्या जिवलगाचा वियोग अस्वस्थ करेल. उत्तरार्धात काही जणांना प्रवासयोग येतील तर काही जणांना आपल्या उपक्रमात विरोधाचा सामना करावा लागेल. 
 
सिंह-कौटुंबिक स्थैर्य लाभेल
 
कौटुंबिक सुसंवाद मानसिक समाधान देतील.  धनवृद्धी करणार्‍या योजना व्यावसायिक राबवतील. नोकरदार अधिकार संपन्न होतील तसेच त्यांना आर्थिक स्थैर्य लाभेल. नोकरदार आव्हाने पेलण्यापासून ते त्यांच्या पूर्तेपर्यंत प्रवास करतील. अमावस्या सन्मानकारक राहील. लाभ स्थानातील गुरु भ्रमण ऐहिक सुखे देणारे आणि कौटुंबिक स्थैर्याची इच्छापूर्ती करणारे आहे. उत्तरार्ध मान सन्मान देणारा तसेच अर्थप्राप्ती वाढविणारा आहे. सप्ताहाच्या शेवटी काही विशिष्ट प्रसंग तुम्हाला भावुक बनवतील. स्वतःच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगा.
 
कन्या-परदेश प्रवासाचे योग
 
दैनंदिन कामात अडथळे आणि दिरंगाईचा अनुभव येईल. वादाचे मुद्दे टाळल्यास तर कलह आणि त्यातून होणारे मनस्ताप टाळता येतील. अमावस्या मानसिक तणाव वाढवणारी आहे. नोकरदारांना स्वतःचे कार्यक्षेत्र आणि अधिकार याबाबत तडजोड करावी लागेल. वैयक्तिक जीवनात सामाजिक घटना तुमचा अपेक्षाभंग करू शकतात. गुरु भ्रमण अपयशाचा सामना करायला लावेल. उत्तरार्धात दूरच्या किंवा परदेश प्रवासाचे योग येतील. सप्ताहांती तुमच्या कार्यात पत्नीचा उत्तम सहभाग  राहील.
 
तूळ-बुद्धीजीवी वर्गास  प्रशंसा लाभेल
 
नोकरीत आणि व्यवसायात यशाचे प्रमाण वाढेल. बुद्धीजीवी वर्ग प्रशंसनीय कामे करेल. अष्टमातील अमावस्या आरोग्य नाजूक ठेवणारी आहे. वेळोवेळी मानसिक संतुलन कायम राखून विविध प्रसंगात निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नोकरीत अधिकारी वर्गाला कर्मचार्‍यांचा विरोध सहन करावा लागेल. पत्नीच्या  आणि संततीच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगा. नवम स्थानातील गुरुचे भ्रमण भाग्यवृद्धी करणारे राहील. संतती इच्छूंना सुवार्ता लाभतील. सप्ताहाचा शेवट सुख समाधान वाढविणारा आणि विरोध मिटविणारा राहील.
 
वृश्चिक-भावनांवर नियंत्रण ठेवा
 
राशीच्या सप्तम स्थानातील रवी-बुध वैवाहिक जीवनात कलह करून एखाद्या प्रिय व्यक्तीचा वियोग करविण्याची शक्यता आहे. पती-पत्नीचे नाते सुदृढ राखण्यासाठी एकमेकाबद्दल विश्वास आणि आदर राखा. सप्तम स्थानात होणारी अमावस्या वैवाहिक जोडीदाराचे आरोग्य नाजूक ठेवेल. आहार सुयोग्य ठेवून तुम्ही स्वतःची उदर पिडा टाळू शकता. अष्टमातील गुरु भ्रमण कुटुंबात अस्वस्थ करणारे प्रसंग आणेल. भावनांवर नियंत्रण ठेऊन विचारपूर्वक मार्ग काढायला हवा.
 
धनु-कार्यात यश मिळेल
 
व्यावसायिकांना मनासारखा धनलाभ होईल तर नोकरदारांना आर्थिक स्थैर्य लाभेल. प्रशंसायोग्य कामातून नावलौकिक वाढेल. अमावस्या विरोधकांचा त्रास वाढवणारी संततीचे आरोग्य नाजूक  ठेवून स्वतःला अस्वस्थ ठेवणारी आहे. गुरुभ्रमण विवाहेच्छूंच्या मनोकामना पूर्ण करणारे आणि विवाहितांना संसारसुखाचा आनंद देणारे आहे. बुधावारी आपल्या कार्यात विशेष यश प्राप्ती होऊ शकते. उत्तरार्धात जवळच्या नात्यातील ओलावा जपण्याची आवश्यकता आहे. सप्ताहांती कलाकारांच्या कला प्रदर्शनास रसिकांकडून दाद मिळेल.
 
मकर-मोठ्या कल्पनांचा प्रभाव
 
पती-पत्नीत विसंवाद घडतील. तुमच्या लहान मुलामुलींच्या सवयी आणि आवडी निवडी यात लक्ष घालणे आवश्यक आहे. आपल्या संगतीतील व्यक्तीना आपले मनोगत सांगण्यापूर्वी त्यांची विश्वास पात्रता तपासणे योग्य ठरेल. नोकरदार मोठ्या कल्पना आणि मोठ्या योजना यांच्या प्रभावाखाली रहातील. परंतु आपल्या योजना सध्या तरी वास्तवात उतरणे कठीण आहे. कौटुंबिक मतभेद आणि अनारोग्य तुमचा मनस्ताप वाढवणारे आहे. तृतीयातील शनी तुमचे मानसिक संतुलन राखेल आणि सप्ताहांती यश प्राप्ती लाभेल.
 
कुंभ-घरात मंगल कार्ये घडतील
 
सप्ताहाचा प्रारंभ उत्तम गृहसौख्य देणारा आणि नवे मित्र जोडणारा आहे. वाढत्या आर्थिक उलाढालीने व्यापारी सुखावतील. चतुर्थ स्थानात होणारी अमावस्या आरोग्यात बिघडवणारी किंवा मानसिक संतुलन ढळविणारी राहील. कौटुंबिक खर्चात वाढ होईल. आप्तेष्टांशी होणारे मतभेद संवादातून मिटवा. राशीच्या पंचम स्थानातून भ्रमण करणारा गुरु घरात मंगल कार्ये घडवेल. मान वाढवणार्‍या समारंभांना तुमची उपस्थिती राहील. उत्तरार्ध विशिष्ट प्रसंगात आर्थिक कोंडी करू शकतो. सप्ताहांती भावुक करणारे प्रसंग येतील.
 
मीन-नियोजनातून यशप्राप्ती
 
मानसिक चंचलता धरसोड वृत्ती वाढवेल. स्वतःच्या कृतीचे अथवा उपक्रमांचे नियोजन योग्य पद्धतीने केले असल्याची खात्री करून घ्या. त्यातूनच यशाची खात्री वाढेल. तृतीय स्थानातील अमावस्या प्रवासाची शक्यता दर्शक असली तरी दगदग वाढवणारी आहे. एखाद्या नातेवाईकाशी अथवा शेजार्‍याशी भांडण होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्र तसेच वित्त क्षेत्र अशा क्षेत्रात अधिकाराच्या अहंकारातून होणारी कामे बिघडू शकतात. उत्तरार्धात संततीच्या कृतीने मनस्ताप संभवतो. सप्ताहाच्या शेवटी विसरभोळेपणाने व्यावहारिक नुकसान संभवते.