पुण्यात केशवनगर परिसरात डासांचा उच्छाद   

पुणे : पुण्यातील खराडी भागात गेल्या काही दिवस डासांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील केशवनगरच्या नदीपात्रात डासांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे येथील रहिवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला.
 
पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात साठलेल्या जलपर्णी तसेच या वाढलेल्या जलपर्णींमुळे या परिसरात डास, मच्छर, कीटक आणि माश्यांचे प्रमाण वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या डासांमुळे मोठ्या प्रमाणावर येथील स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महानगरपालिका प्रशासनाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
 
पुण्यात वाहणाऱ्या मुळा-मुठा नदीपत्रात वाढलेले प्रदूषण आणि जलपर्णी यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. स्थानिक नागरिक बरेच दिवस जलपर्णी काढण्यासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र, महापालिकेने पूर्णपणे दुर्लक्ष केले. हे दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यावरच बेतले आहे. 
 
खरे तर मुळा-मुठा सुधार प्रकल्पाचे काम गेल्या बरीच वर्षे रखडले आहे. एका आंतरराष्ट्रीय कंपनीला नदी सुधार प्रकल्पाचे काम देण्यात आले आहे. मात्र, ते न केल्याने या कामाचा फटका आता थेट नागरिकांना बसत आहे. स्थानिकांनी याबाबत बोलताना सांगितले,'' डासांचा त्रास इतका आहे की, संध्याकाळी सहानंतर नागरिकांना घराच्या बाहेर देखील पडता येत नाही. खराडी परिसरातील नदीच्या बाजूला एक शाळा आहे. डासांच्या या त्रासामुळे या शाळेतील मुले देखील मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत. या परिसरात डेंग्यू आणि मलेरियाचे रोज शेकडो रुग्ण सापडत आहेत. दोन दिवसात या भागातील जलपर्णी काढली नाही, तर आयुक्तांना येथील जलपर्णी काढून त्यांच्या दालनात देऊन भेट देण्यात येईल असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

Related Articles