सत्ता स्थापनेसाठी मोर्चेबांधणीला वेग   

पाकिस्तानात प्रमुख पक्षांत वाटाघाटी

 
इस्लामाबाद : पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. त्यामुळे आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठीं तीन प्रमुख पक्षांनी आता मोर्चेबांधणी वेगाने सुरू केली आहे. तसेच वाटाघाटी सुरू केल्या आहेत. 
 
निवडणूक आयोगाने 259 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. त्यात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तेहरीक ए इन्साफ पक्षाचे 101 उमेदवार निवडून आले आहेत. आयोगाने त्यांच्या पक्षाचे चिन्ह बॅट गोठवले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्षाने 75 जागा जिंकल्या असून बिलावल झरदारी भुतो यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पक्षाने 54 जागा जिंकल्या आहेत. 
 
कराचीतील मुथेहिदा कौमी मूव्हमेंटचे 17, तर 12 अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. एकूण 266 जागांचा विचार केला तर बहुमतासाठी 133 जागांची गरज आहे; परंतु कोणत्याही पक्षाला एवढ्या जागा प्राप्‍त झालेल्या नाहीत. त्यामुळे तेथे आघाडी सरकार स्थापन करण्याशिवाय अन्य पर्याय पक्षांसमोर उरलेला नाही. त्यामुळे आता प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. 
 

दृष्टिक्षेपात निकाल 

 
निकाल जाहीर : 259
तेहरीक ए इन्साफ पक्ष (इम्रान) : 101
पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) : 75
पाकिस्तान पीपल्स पार्टी : (बिलावल) : 54
मुथेहिदा कौमी मूव्हमेंट : 17
अपक्ष : 12 
 

सरकार असे स्थापन होईल...

 
इम्रान समर्थक उमेदवारांनी स्वतंत्र चिन्हावर निवडणूक लढविली होती. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या नवाझ शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) पक्ष 75 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्यांना लष्करप्रमुख मुनीर यांनी सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे त्यांचे पारडे सध्या तरी जड दिसत आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) आणि बिलावल यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी यांनी अन्य पक्षांसोबत आघाडी केली तर ते सत्ता स्थापन करू  शकतात. 
 

उच्च न्यायालयांत आव्हान अर्जांचा खच

 
अनेकांनी निकालाला आव्हान देणारे अर्ज न्यायालयात केले आहेत. त्यामुळे अशा अर्जांचा खच न्यायालयात पडला आहे. प्रामुख्याने इम्रान खान यांच्या पराभूत उमेदवारांनी ते केले आहेत. 
 

Related Articles