फोन आले तरी, हळवे बनू नका : अजित पवार   

पुणे : कुणाचे फोन आले तर, तुमच्या मनामध्ये चलबिचल होईल. परंतु तुम्ही हळवे बनू नका. रोज फोन करायला लागलोे तर तेवढे एकच काम आम्हाला करावे लागेल. पण, विकासाचे काम नक्‍की करू. कोणतेही काम पूर्ण करून देऊ. नव्या विचाराने आपण पुढे जात आहोत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. ते पुण्यामध्ये आयोजित ’स्वराज्य सभे’मध्ये रविवारी बोलत होते. 
 
पंतप्रधान मोदी यांनी 80 कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य दिले असून, दोन कोटी घरे बांधण्याचे आश्‍वासन दिले आहे. जे झाले ते मान्य केलेच पाहिजे. त्यांच्या व्हिजनचा फायदा राज्याला करून घ्यायचा आहे. आपली फरफट होऊ नये यासाठी आपल्याला वेगळा निर्णय घ्यावा लागला. सध्या पंतप्रधान मोदी यांना कोणीही पर्याय नाही. आपल्याला तिसर्‍यांदा मोदी यांना  निवडून आणायचे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री-मुख्यमंत्री, अशा घोषणा देणार्‍या कार्यकर्त्यांना अजित पवार यांनी सल्ला दिला आहे. जरा कळ सोसा, नुसते मुख्यमंत्री-मुख्यमंत्री करू नका. पक्ष संघटना मजबूत करण्याकडे आधी लक्ष द्या, असे सांगताना ते म्हणाले, आपण विचारधारा सोडलेली नाही. धर्मनिरपेक्षता ही आपली विचारधारा आहे. फक्त काळानुसार आपल्याला बदलावे लागते. राष्ट्रवादीने कायम वंचिताचा विचार केला आहे.
 
नव्या विचारांनी आपण पुढे चाललो आहोत. माझे नेहमीच तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष असते. युवकांना बळ देणे महत्त्वाचे आहे. क्रीडाक्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहे. निवडणुका समोर ठेवून काही घोषणा करणे मला जमत नाही. राष्ट्रवादीकडे क्रीडा खाते आले तेव्हा ऑलिम्पिक भवनाला निधी दिला, अशी माहिती पवार यांनी दिली.
 
शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. शिवरायांचा धगधगता इतिहास जागृत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. महाराजांचा इतिहास कळावा, त्यांचे धैर्य, शौर्य याची माहिती मिळावी, यासाठी कार्यक्रम आखले जाणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
 

Related Articles