मोठ्या उंचीचा कलावंत!   

किशोरी शहाणे, (प्रसिद्ध अभिनेत्री)

 
अशोकजी एखाद्या-दुसर्‍या माणसाला नव्हे तर संपूर्ण युनिटलाच सांभाळून घेतात. यामागे चित्रपट चांगला झालो पाहिजे, हाच उद्देश असतो. कॅमेर्‍याच्या मागे काय होते, हे त्यांच्या दृष्टीने फारसे महत्त्वाचे नसते. आजपर्यंत त्यांच्याइतका प्रामाणिक आणि कामाला चोख माणूस मी पाहिला नाही. अशा या ज्येष्ठ  अभिनेत्याला ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने गौरवान्वित केले जाणे निश्‍चितच आनंददायी आहे.
 
अशोक सराफ हे नाव मराठी तसेच हिंदी चित्रसृष्टीत वेगळाच दबदबा राखून आहे. त्यामुळेच त्यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराने सन्मानित करणे हा सरकारचा उचित निर्णय आहे, असेच म्हणावे लागेल. त्यांच्या या गौरवाचा व्यक्तिश: मला अतिशय अभिमान वाटत आहे. हे कमाल व्यक्तिमत्त्व या पुरस्काराला पूर्णपणे पात्र आहे. अभिनेता म्हणूनच नव्हे, तर एक व्यक्ती म्हणूनही मी त्यांना जवळून पाहिले आहे. 
 
‘प्रेम करु या खुल्लमखुल्ला’ या माझ्या पहिल्या चित्रपटात ते सहकलाकार होते तर लक्ष्मीकांत बेर्डे माझे नायक  होते. त्यावेळी मी चित्रसृष्टीत अगदीच नवखी होते पण ते दोघे मात्र सुपरस्टार होते. अशोक मोठा नायक होते तर लक्ष्मीकांत उदयोन्मुख सुपरस्टार होता. या दोघांबरोबर काम करण्याची संधी मिळाली हे भाग्यच म्हणायला हवे. त्यावेळी मी 16 वर्षांची होते. त्यांनी मला चांगल्या प्रकारे सांभाळून घेतले. मला नवखेपणाची जाणीवही होऊ दिली नाही. खरे तर सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. पण माझ्या सहज लक्षात याव्यात, अशा पद्धतीने त्यांनी मला कामातले सगळे बारकावे शिकवले आणि आत्मविश्‍वास देऊ केला. ‘माझा पती करोडपती’ हा माझा दुसरा चित्रपटही त्यांच्याबरोबरच होता आणि त्यानंतरचे बरेच चित्रपटही त्यांच्याच बरोबर होते.
 
थोडक्यात, अशोक सराफ आणि माझी जोडी चांगलीच गाजली. रसिकांना ती आवडली. त्यामुळेच मी त्यांच्याबरोबर ‘चंगू मंगू’, ‘आत्मविश्‍वास’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’ असे अनेक चित्रपट केले.  अलिकडे ‘जीवनसंध्या’ या चित्रपटामध्ये माझी आणि अशोकजींची जोडी होती. आमच्यामध्ये प्रथमपासून खूप छान केमिस्ट्री होती. त्यामुळेच आम्ही दोघेही कामाचा आनंद घेऊ शकलो आणि अभिनेता तसेच व्यक्ती म्हणून एकमेकांना चांगले समजून घेऊ शकलो.
 
आधी मी स्वत:साठी वेगळा डबा मागवत असे. पण अशोक मात्र केटरर देईल ते ताटभर खात असत. मग ते तेलकट असो वा तिखट... अर्थात त्यांचा आहार कमी आहे. पण वाढले जाईल ते खाणे ही त्यांची पहिल्यापासूनच सवय... स्वत:च्या वेगळ्या अशा काही मागण्या नाहीत. ‘ऐका दाजीबा’ या माझी निर्मिती आणि पतीचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटातही आम्ही त्यांच्या या स्वभावाचा अनुभव घेतला. आम्ही दोघेही त्यांना उशिरा येण्यास सांगायचो. त्यासाठी आधी अन्य कलाकाराचा सीन घेत असल्याचे त्यांना कळवले जायचे. पण तरीदेखील अशोकजी साडे आठच्या ठोक्याला सेटवर हजर असत. लवकर येण्यामागचे कारण विचारता ‘युनिट असलेल्या ठिकाणी वेळ घालवणे मला आवडते...’ असे ऐकायला मिळायचे. असे समर्पण बघायला मिळणे आता अवघड झाले आहे. काम संपायला रात्रीचे दहा वाजले तरी अशोकजींची कुरकुर नसायची. इतर सहकलाकार पॅक अप कधी होतेय याची वाट बघत असताना हा माणूस मात्र शांतपणे काम करताना दिसायचा. 
 
खरे सांगायचे तर, यातच अशा माणसांचे मोठेपण सामावलेले असते. त्यांना दुरुन न्याहाळले, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तरी एखादी व्यक्ती मोठी कलाकार होऊ शकते, स्टार बनू शकते. शेवटी अभिनेता असण्याबरोबरच माणूस म्हणून तो कसा आहे ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. माझ्यामध्ये अशोक आधी खूप मोठा आणि चांगला माणूस आहेत. म्हणूनच या सन्मानासाठी सर्वार्थाने पात्र आहेत.
 
आजकालचे तथाकथित स्टार्स वा नामवंत कलाकार आपल्यावरच कॅमेरा कसा राहील, या विचारात असतात. आपल्यापेक्षा छोट्या कलाकारांकडे त्यांचे लक्षही नसते. मात्र अशोकजींनी कधीच असा विचार केला नाही. सीन चांगला कसा होईल, हा विचार करुनच त्यांनी प्रत्येक भूमिका पेलली. छोट्यातल्या छोट्या वा नवीन कलाकाराच्या तोंडी महत्त्वाचे वाक्य असेल तर त्याला महत्त्व दिले गेले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असायचा. मोठ्या कलाकाराचे असे विचार अनेकांना प्रेरित करत असतात, घडवत असतात. म्हणूनच जशी एक लता मंगेशकर तसेच एकच अशोक सराफ आहेत असे मी म्हणेन. त्यामुळे त्यांना असे मोठे पुरस्कार मिळायला हवेत.
 
आज ‘चंगू मंगू’ चित्रपटाच्या वेळेचा एक प्रसंग आठवतोय. त्यात मी, निवेदिता, अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे अशा चौघांचे एक गाणे होते. आम्ही दोघी रुसल्या असल्याने ते आमची समजूत काढत असल्याचा साधारण भाव होता. त्यात मी रागाने अशोकजींच्या पायावर पाय मारते, असा सीन होता. आधी सांगितल्याप्रमाणे नवखी असल्यामुळे किती जोरात पाय मारायचा हे समजलेच नाही. मी पायात उंच टाचांच्या चपला असताना त्यांच्या पायावर जोरात पाय मारला आणि तो बिचारा कासाविस झाला... पुढचे दोन दिवस सुजलेल्या पायानिशी तो गाणे पूर्ण करत होता. अनवधनाने झालेल्या चुकीबद्दल मी क्षणाक्षणाला त्यांची माफी मागत होते, पण त्यांनी एकदाही मला काही जाणवू दिले नाही. उलट ‘असे होते’ म्हणत समजत घालत राहिले आणि आता दुसरा पाय नको तोडूस... असे म्हणत वातावरण हलके करण्याचा प्रयत्न केला.  आपला सीन नसतानाही दुसर्‍या एखाद्या सीनसाठी सल्ला देण्यासही अशोकजींनी कधीच काही हातचे राखून ठेवलेले आठवत नाही. कधी कधी आपल्याला एखाद्या भूमिकेचे सगळे पापुद्रे समजत नाहीत. अशा वेळी अशोकसारखा कलाकार ठराविक पदर उलगडून दाखवतो आणि काम अधिक उजवे होण्यास मदत होते. अशोकजींसारख्या व्यक्तिमत्त्वाची ही करामत असते. त्यांचा उत्साह, आरोग्यजतन हे सगळेच शिकण्यासारखे आहे, घेण्यासारखे आहे. अशा या मोठ्या कलाकारासाठी महाराष्ट्रभूषण पुरस्कार अनुरुप आहे, याबाबत शंका नाही.  
 

...म्हणून ही माणसे मोठी...

 
सर्वप्रथम मामांना नमस्कार आणि ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्काराचे मानकरी झाल्याबद्दल त्रिवार अभिनंदन. अभिनयाचे चालते-बोलते जिवंत विद्यापीठ म्हणजे अशोकमामा! अभिनयाचे अत्यंत सूक्ष्म अध्ययन करणार्‍या या व्यक्तिमत्त्वाच्या परिघात येणे हेच परिसाला स्पर्श करण्यासारखे आहे. माझे भाग्य हे की सात दिवसांच्या अंतराने प्रदर्शित झालेल्या ‘एकापेक्षा एक’ आणि ‘शेजारी शेजारी’ या दोन्ही चित्रपटात मला मामांची नायिका होण्याची संधी मिळाली. केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर व्यक्ती म्हणून उंची गाठणारा, संस्कृतीची पाळेमुळे घट्ट धरुन राहणारा हा विलक्षण माणूस आहे.  इथे एक किस्सा सांगते. ‘टोपीवर टोपी’ हा चित्रपट आम्ही कोल्हापूरला चित्रित करत होतो. त्यातील एका गाण्यासाठी एका उंच क्रेनवर बसलो होतो. पाहतो तो खाली प्रचंड जनसमुदाय जमलेला दिसला. मला त्याचे कारण काही समजेना. सहजच मी मामांना कारण विचारले. तर ते शांतपणे म्हणाले, पंचवीस वर्षे झाली ना! ...कशाला? माझा पुढचा प्रश्‍न... माझ्या कारकीर्दीला... त्यांचे तेवढेच शांत उत्तर. इतक्या उंचीवर पोहोचल्यानंतरही दिसणार्‍या त्यांच्या स्थितप्रज्ञ भावनेचे आणि स्वभावाचे मला आश्‍चर्य वाटले. मी याविषयी विचारले असता ते म्हणाले, ‘यावर काय बोलायचे. मी नेटाने काम करण्यावर विश्‍वास ठेवतो. किती वर्ष काम केले, हे मी कधीच मोजत नाही.’ या मोजक्या वाक्यातूनच त्यांची संपूर्ण मानसिक बैठक समजते. हा माणूस नाही तर त्याचे काम बोलते. दुर्गुणाचा स्पर्शही न झाल्यामुळेच ही माणसे मोठी आहेत असे मला वाटते.  त्यांना असे अनेक पुरस्कार मिळोत हीच शुभकामना.
 

(शब्दांकन-स्वाती पेशवे)

 

Related Articles