सर्व प्रश्‍न चुटकीसरशी सोडवणारा मी जादूगार नाही   

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड 

 
नवी दिल्ली : देशभरातील न्यायालयांचे सर्व प्रश्‍न चुटकीसरशी सोडवणारा मी जादूगार नाही, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी नमूद केले. सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारल्यापासून त्यांनी न्यायालयातील जुन्या समस्या सोडवण्याची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू केली आहे. ज्या दिवशी मी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली, त्या दिवशी मी न्यायालयाच्या सदस्यांना, बारला आणि अगदी याचिकाकर्त्यांना सांगितले की, मी जादूगार नाही की सर्व समस्या चुटकीसरशी सोडवू शकेन, असेही चंद्रचूड यांनी सांगितले. 
 
चंद्रचूड म्हणाले, न्यायालयांवर परिणाम करणार्‍या दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याची माझी योजना होती. म्हणून, मी सर्वप्रथम माझ्या खंडपीठातील सहकार्‍यांचा सल्ला घेतला आणि त्यांचे मत जाणून घेतले. न्यायपालिकेवर परिणाम करणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यासाठी न्यायिक अधिकारी, अभ्यासक आणि संशोधकांची एक टीम तयार केली. न्यायालयीन पायाभूत सुविधा सुधारणे, केवळ न्यायाधीशांच्याच नव्हे, तर न्यायालयीन कर्मचार्‍यांच्या क्षमता वाढवणे आणि न्यायालयातील खटले प्रलंबित राहण्याचे प्रमाण कमी करणे हे घटक महत्त्वाचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
प्रलंबित प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ होणार नाही याची आम्ही खात्री केली आहे. या संदर्भात आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही पूर्ण होणार्‍या प्रकरणांची संख्या देखील वाढवली आहे. महत्त्वाच्या घटनात्मक खटल्यांचा निपटारा केला आहे. किमान एक घटनापीठ सतत कार्यरत असते. असे केल्याने आम्ही अनेक वर्षे आणि दशकांपासून प्रलंबित घटनात्मक प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. अनेक प्रकरणे घटनापीठासमोर सुनावणीसाठी रांगेत असल्याने भविष्यातही हे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
प्रशासकीय स्तरावर सुधारणा आणताना आम्ही सर्वोच्च न्यायालयात आयसीटी सक्षम न्यायालये स्थापन केली आहेत. याव्यतिरिक्त, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि ट्रान्सक्रिप्शन टूल्ससाठी महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा वापर, प्रतिलेखांचे सारांश, भाषांतर, न्यायालयीन खटल्यांसाठी विशेष स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म तयार करणे आणि प्रक्रिया ऑटोमेशन यासाठी सहकार्यासाठी आयआयटी मद्राससोबत सामंजस्य करार देखील करण्यात आल्याचे चंद्रचूड यांनी यावेळी स्पष्ट आहे.
 

एका वर्षात 50 हजार प्रकरणे निकाली 

 
या व्यतिरिक्त, तंत्रज्ञानाचा अवलंब आणि घटनात्मक खटल्यांची सुनावणी ही दोन क्षेत्रे वेगवान करणे आवश्यक आहे, असे मला वैयक्तिकरित्या वाटते. गेल्या वर्षभरात सर्वोच्च न्यायालय आणि न्यायपालिकेच्या कामकाजात बरीच प्रगती झाली आहे. न्यायालयीन बाजूने, एका वर्षात सुमारे 50 हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत, जी त्याच कालावधीत दाखल झालेल्या प्रकरणांच्या संख्येइतकी आहे, असेही चंद्रचूड म्हणाले. 
 

Related Articles