‘जरांडेश्‍वर’च्या मालकीसाठी शालिनी पाटील उच्च न्यायालयात   

पुणे : सातारा जिल्ह्यातील जरांडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा ताबा मिळविण्यासाठी, या कारखान्याच्या संस्थापक अध्यक्ष शालिनीताई पाटील यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) टांगती तलवार अद्याप कायम आहे.
 
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मालकीच्या गुरू कमॉडिटीज कंपनीने 2010 मध्ये जरांडेश्‍वर सहकारी साखर कारखाना लिलावाद्वारे कमी भावात खरेदी केला होता. या व्यवहारात अनियमितता व बेकायदेशीर बाबी असल्याचे ईडीच्या तपासातून निष्पन्‍न झाले होते. त्यामुळे हा साखर कारखाना मूळ मालकाच्या ताब्यात देण्याची मागणी पाटील यांनी अर्जाद्वारे केली आहे.
 
जरांडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे मूल्य 104 कोटींचे असताना या कारखान्याची विक्री 63 कोटीत करण्यात आली होती. अजित पवार हे राज्य सहकारी बँकेचे संचालक असताना, त्यांनी लाखो रुपयांचे वार्षिक उत्पन्‍न असलेल्या गुरू कमॉडिटीजला अब्जावधीची किंमत असलेला जरांडेश्‍वर सहकारी साखर कारखाना नियम धाब्यावर बसवून विकण्यात आल्याचेे या अर्जात म्हटले आहे. कारखान्याची किंमत यंत्रसामुग्री व भूखंडासह 1 अब्ज 3 कोटी 31 लाख 60 हजार असताना गुरू कमॉडिटीजला 62 कोटी 75 लाखांना विकण्यात आला. 
 
गुरू कमॉडिटीजने बेकायदेशीर व्यवहार करून कारखाना खरेदी केल्याचे ईडीने केलेल्या तपासाद्वारे उघडकीस आले असून जप्‍त केलेला कारखाना आणि त्याची मालमत्ता मूळ संस्थापकांच्या ताब्यात देण्याची  मागणी पाटील यांनी केली आहे. तसेच, यामुळे सहकार चळवळीवर सकारात्मक परिणाम होऊन साखर व्यवसायाला चालना मिळेल, असेही पाटील यांनी अर्जात म्हटले आहे.
 

Related Articles