‘गांधी’चा दिशादर्शक   

रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या जन्मशताब्दीनिमित्त...

भालचंद्र गुजर

 
रिचर्ड अ‍ॅटनबरो यांचे नाव घेतले, की त्यांच्या आठ ऑस्कर पारितोषिकांनी सन्मानित झालेल्या ‘गांधी’ या महाकाव्य सदृष चित्रपटाची आठवण येणे तसे अपरिहार्यच असते. पण त्यांचे चित्रपटकर्तृत्व या एकाच चित्रपटापुरते मर्यादित नव्हते, तर त्यापलीकडेही विस्तारलेले होते. चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून त्यांनी केवळ ब्रिटिश चित्रपटसृष्टीवरच नव्हे, तर जागतिक चित्रपटसृष्टीवरही आपली लखलखीत नाममुद्रा उमटवली होती. आपल्या सुमारे पाच दशकांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी सुमारे 70 चित्रपटांतून अभिनय केला आणि 12 चित्रपटांचे दिग्दर्शन व 13 चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांचे सर्वच चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाले नव्हते, तरी त्यातील कलात्मकता मात्र नेहमीच गौरविली गेली. अ‍ॅटनबरोंचे चित्रपट क्षेत्रातील कामगिरी 2 ऑस्कर पारितोषिकांनी, तसेच 5 बाफ्ता अवॉर्ड आणि 4 गोल्डन ग्लोब अवॉर्डने सन्मानित झाली होती. या शिवाय ब्रिटिश सरकारचा ‘कमांडर ऑफ दि ब्रिटिश एम्पॉयर’, फ्रान्सचा ‘दि लिजन ऑफ ऑनर’ आणि भारत सरकारचा ‘पद्मभूषण’ पुरस्कारही त्यांना लाभला होता.
 
रिचर्ड सॅम्युअल अ‍ॅटनबरो यांचा जन्म 29 ऑगस्ट 1923 रोजी इंग्लंडमधील एका सुसंस्कृत आणि विद्याव्यासंगी कुटुंबात झाला. त्यांचे वडील फ्रेडरिक लेव्ही अ‍ॅटनबरो हे लीसेस्टरच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, तर आई मेरी ही समाजसेविका. लीसेस्टरच्या वायगेस्टन ग्रामर स्कूलमधून रिचर्डने प्राथमिक शिक्षण झाले. अभ्यासात तो तसा जेमतेमच होता. पण त्याला अभिनयाची गोडी होती. त्यामुळे शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रिचर्डला त्याच्या वडिलांनी अभिनयाचे शिक्षण घेण्यासाठी ‘रॉयल अ‍ॅकेडमी ऑफ ड्रॅमेटिक आर्ट’ (राडा) मध्ये दाखल केले. दोन वर्षांनंतर अभिनयाची पदवी मिळवल्यावर त्यांनी रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. यूजीन ओ ‘नीलच्या ‘आह, वाइल्डरनेस’ या नाटकातून त्यांनी सर्वप्रथम रंगभूमीवर पदार्पण केले. पण अभिनय क्षेत्रात स्थिरावण्यापूर्वीच अ‍ॅटनबरो यांनी लष्करात प्रवेश केला आणि वैमानिकाचे प्रशिक्षण घेऊन ते ‘रॉयल एअरफोर्स’मध्ये कार्यरत झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात त्यांनी दोन वर्षे प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव घेतला.
 
1946 मध्ये युद्धभूमीवरून परत आल्यावर अ‍ॅटनबरो यांनी पुन्हा ‘वेस्ट एंड’वर अभिनय करण्यास सुरुवात केली. आरंभी लहानसहान भूमिका केल्यावर त्यांना 1952 मध्ये अगाथा ख्रिस्तीच्या ‘माऊसट्रॅप’ या नाटकात सार्जंट ट्रॉटरची लक्षणीय भूमिका मिळाली आणि मग ते रंगभूमीवर स्थिरावले. रंगभूमीवर कार्यरत असताना अ‍ॅटनबरो चित्रपटातही अभिनय करीत होते. ‘इन विच वुई सर्व्ह’ (1942) हा त्यांची भूमिका असलेला पहिला चित्रपट; पण चित्रपटाच्या श्रेयनामावलीत त्यांचा उल्लेख नव्हता. ‘दि हंड्रेड पाऊंड विंडो’ (1944), ‘जर्नी टुगेदर’ (1945), ‘ए मॅटर ऑफ लाइफ अँड डेथ’ (1946), ‘दि मॅन वीदिन’ (1947) अशा त्यांच्या चित्रपटातील भूमिकांची दखल प्रेक्षकांनी घेतली नाही. ग्रॅहॅम ग्रीनच्या कादंबरीवरील ‘ब्रायटन रॉक’या 1948 मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील पिंकी ब्राऊन या स्मगलरची त्यांनी केलेली भूमिका लक्षणीय ठरली आणि मग त्यांची अभिनय कारकीर्द गतिमान झाली. ‘मॉर्निंग डिपार्चर’ (1950), ‘सी अँड सँड’ (1958), ‘दि अँग्री सायलेन्स’ (1959), ‘दि ग्रेट एस्केप’ (1963), ‘दि पिंक पँथर’ (1968), ‘ए ब्रीज टू फार’ (1977) हे अ‍ॅटनबरोंच्या भूमिका असलेले काही लक्षणीय चित्रपट. महत्त्वाचे म्हणजे सत्यजित राय यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ (1978) मध्ये त्यांनी लेफ्टनंट जनरल औट्रमची भूमिका समर्थपणे साकारली होती. अ‍ॅटनबरोंचे वैशिष्ट्य म्हणजे, आपल्या अभिनय कारकीर्दीत एकदाही नायकाची भूमिका केली नव्हती.
 
अभिनेता म्हणून यशस्वी झाल्यावर अ‍ॅटनबरो चित्रपट निर्मितीकडे वळले आणि 1959 मध्ये त्यांनी पटकथा लेखक व दिग्दर्शक ब्रायन फोर्ब्स यांच्या सहकार्याने ‘बीव्हर फिल्म्स’ची स्थापना केली. ‘दि अँग्री सायलेन्स’ (1960) हा त्यांचा पहिला चित्रपट. आरंभी तद्दन व्यावसायिक चित्रपटांची निर्मिती करून आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यावर त्यांनी कलात्मक चित्रपटांची निर्मिती केली. ‘ओ! व्हॉट ए लव्हली वॉर’ (1969) या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले. ‘यंग विन्स्टन’ (1972) आणि ‘ए ब्रीज टू फार’ (1977) हे अ‍ॅटनबरोंचे महत्त्वाचे चित्रपट. त्यातून त्यांचे दिग्दर्शनकौशल्य प्रेक्षक प्रत्ययास येते. पैकी ‘यंग विन्स्टन’मध्ये त्यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या शालेय जीवनापासून ते संसदेच्या पहिल्या निवडणुकीपर्यंतच्या काळाचा आढावा घेतला आहे; तर ‘ए ब्रीज टू फार’ ला दुसर्‍या महायुद्धाची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. हे दोन्ही चित्रपट व्यावसायिक आणि कलात्मकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरले. ‘मॅजिक’ (1978) हा अ‍ॅटनबरोंचा आणखी एक यशस्वी चित्रपट. त्यात अँथनी हॉपकिन्सने मनोविकृत खुनी नायकाची भूमिका अतिशय समरसून केली होती.
 
1962 मध्ये लुई फिशरने लिहिलेले म. गांधींचे चरित्र अ‍ॅटनबरोंच्या वाचनात आले आणि त्यांनी या विषयावर चित्रपट काढण्याचे ठरवले. प्राथमिक जुळवाजुळवीनंतर अ‍ॅटनबरो पंडित नेहरूंना भेटले आणि त्यांना आपली चित्रपटाची योजना समजावून दिली. नेहरूंनी त्याला मान्यता दिली आणि भारत सरकार व ब्रिटिश सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटनिर्मिती करण्याचे निश्‍चित केले गेले. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले आणि त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या लाल बहादूर शास्त्रींच्या अल्पकालीन राजवटीत भारत-पाक युद्धाला अग्रक्रम दिला गेल्याने चित्रपटाचा विषय दुर्लक्षिला गेला. नंतरच्या पंतप्रधान इंदिरा गांधींनी चित्रपटाला मान्यता दिली, पण 1975 ची आणीबाणी व नंतर इंदिरा गांधींचा पराभव होऊन आलेले जनता पार्टीचे सरकार या भारतातील राजकीय अस्थिरतेमुळे चित्रपटाची कल्पना पुन्हा एकदा मागे सरकली. तरीही निराश न होता, अ‍ॅटनबरो चित्रपटनिर्मितीचा प्रयत्न करीतच राहिले. शेवटी वीस वर्षांच्या दीर्घकालीन प्रतीक्षेनंतर अथक परिश्रमाने सिद्ध झालेला त्यांचा ‘गांधी’ 30 नोव्हेंबर 1982 रोजी प्रदर्शित झाला आणि व्यावसायिक व कलात्मक यशाचा त्याने जागतिक चित्रपटविश्‍वात मानदंड निर्माण केला. त्याला ऑस्कर पारितोषिकासाठी 11 नामांकने आणि प्रत्यक्षात आठ पारितोषिके मिळाली. ‘गांधी’ची निर्मितीप्रक्रिया अ‍ॅटनबरो यांनी ‘इन सर्च ऑफ गांधी’ (1982) मध्ये विस्ताराने नोंदविली आहे.
 
‘गांधी’च्या अभूतपूर्व यशानंतर अ‍ॅटनबरो पुन्हा एकदा चित्रपटमग्न झाले खरे; पण आता त्यांच्या अभिनयाच्या उर्मी मंदावल्या होत्या आणि चित्रपटनिर्मितीची गतीही कमी झाली होती. या काळात त्यांनी ‘ए कोरस लाईन’ (1985), ‘क्राय फ्रीडम’ (1985), ‘चॅप्लिन’ (1992)  आणि ‘शॅडोलँडस’ (1996) या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केले. त्यातील ‘ए कोरस लाईन’चा अपवाद वगळता उर्वरित चरित्रपट होते. ‘चॅप्लिन’ मध्ये चार्ली चॅप्लिनच्या चरितकहाणी साकार होते, तर ‘शॅडोलँडस’मध्ये ब्रिटिश कादंबरीकार सी. एस. लेविस आणि अमेरिकी ज्यू कवयित्री जॉय डेव्हिडमन यांच्या परस्परसंबंधाचा आढावा घेतला गेला होता. हे चित्रपट बर्‍यापैकी यशस्वी ठरले, पण खरा बोलबाला झाला तो ‘क्राय फ्रीडम’चा. 1970 च्या दशकातील वर्णभेदग्रस्त दक्षिण आफ्रिकेची पार्श्‍वभूमी लाभलेला हा चित्रपट डोनॉल्ड वूड या ब्रिटिश पत्रकाराच्या ‘आस्किंग फॉर ट्रबल’ आणि ‘बिको’ या चरित्रग्रंथांवर आधारित होता. पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीमुळे तुरुंगातच मरण पावलेल्या स्टीव्ह बिको या कृष्णवर्णीय क्रांतिकारकाच्या वर्णभेदविरोधी संघर्षाची विदारक कहाणी या चित्रपटात प्रत्ययकारीपणे सांगितली गेली आहे. ‘क्राय फ्रीडम’ला दक्षिण आफ्रिकेत आणि वर्णभेदसमर्थक देशात बंदी घातली गेली. त्यामुळे या चित्रपटाला फार मोठी प्रसिद्धी मिळूनही अ‍ॅटनबरोंचे आर्थिक नुकसान झाले. सातत्याने चित्रपटनिर्मिती आणि दिग्दर्शनात मग्न असलेल्या अ‍ॅटनबरोंनी या काळात फक्त चार चित्रपटात भूमिका केल्या. मायकेल क्रिश्टनच्या कादंबर्‍यांवरील ‘जुरासिक पार्क’ (1993), ‘दि लॉस्ट वर्ल्ड’ (1997) व ‘जुरासिक वर्ल्ड’ (2013) मध्ये त्यांनी जॉन हेमंडची भूमिका साकारली होती. आणखी एक म्हणजे, शेखर कपूर दिग्दर्शीत ‘एलिझाबेथ’ (1997) मधील सर विल्यम सेसिलची त्यांनी केलेली भूमिका गाजली होती. 2007 मध्ये ‘क्लोजिंग दि रिंग’चे दिग्दर्शन करून अ‍ॅटनबरो यांनी चित्रपट व्यवसायातून स्वेच्छेने निवृत्ती घेतली. 
 
रिचर्ड अ‍ॅटनबरोंचे 24 ऑगस्ट 2014 रोजी निधन झाले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सामाजिक कार्यात मग्न होते. या काळात त्यांनी ‘एंटायरली अप टू यू, डार्लिंग’ (2008) हे आत्मचरित्र लिहिले. त्यात त्यांनी आपल्या समृद्ध आयुष्याचा आढावा घेतला होता. आपण ‘गांधी’सारखा चित्रपट पुन्हा निर्माण करू शकलो नाही, या बद्दल त्यांनी आत्मचरित्राच्या शेवटी खंत व्यक्त केली होती.
 
अ‍ॅटनबरोंची ही खंत रास्त होती. कारण आजमितीला रिचर्ड अ‍ॅटनबरोंचे चित्रपटकर्तृत्व प्रेक्षकस्मरणात असले, तरी त्यांची मूलतः आणि अखेरतः ओळख होती ती ‘गांधी’चा दिग्दर्शक म्हणूनच!
 

Related Articles