E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
कोल्हापूर
नागपूर
नाशिक
नांदेड
जळगाव
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
नगर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
E-Paper
संपादकीय
पास-नापासावरून शिक्षणाची गुणवत्ता ठरते का ?
Kesari Admin
11 Oct 2023
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
शिक्षण हक्क कायदा अस्तित्त्वात येऊन आता जवळपास तेरा वर्षे होत आले आहेत. शिक्षण हक्क कायद्याने विद्यार्थी त्याच वर्गात न ठेवण्याबद्दल सूचित केले होते. हा कायदा लागू झाल्यानंतर कलम 29 मध्ये देशातील प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावादी अध्यापनाची प्रक्रिया केली जाणार होती. शाळा शाळांमध्ये रचनावादी दृष्टीकोनाने अध्यापन करण्यात येऊ लागल्याने त्याचे मूल्यमापन करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने अधिक वेगाने पावले उचलत मूल्यमापन रूजवण्यासाठी राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गाला अध्यापन करणार्या प्रत्येक शिक्षकाला प्रशिक्षण दिले गेले. त्यानुसार गत तेरा वर्षांत राज्यात प्राथमिक स्तरावर स्थगिती पूर्णतः थांबली. मात्र, पुन्हा एकदा केंद्र सरकारने कायद्यात दुरूस्ती करत राज्य सरकारवर निर्णयाची जबाबदारी निश्चित केली आहे. त्यानुसार इयत्ता पाचवी आणि आठवीला परीक्षा घेण्यात येवून विद्यार्थी नापास करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे यापूर्वीच समोर आले आहे.
गत काही वर्षांत मुलांना नापास न करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुले नापास न करता पुढे घेऊन जाणे आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवणे महत्त्वाचे आहे, असे शिक्षणतज्ज्ञ सांगत आहेत. खरच मुले नापास का होतात ? मुले नापास होण्यास शिक्षकांचे अध्यापन किती जबाबदार.. ? मुलांना खरच अभ्यास करावा वाटत नाही का ? की अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके योग्य नाहीत. विद्यार्थी नापास होतात याला कोण जबाबदार आहे ? शाळा, पालक, मुले, की शिक्षक, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके, की परीक्षा पद्धती याचा विचार करण्याची वेळ येऊन ठेवली आहे. मुले नापास केल्याने शिक्षणाची गुणवत्ता उंचावते का ? खरेतर पास, नापास करण्यासंदर्भाने अगदी सूक्ष्म संशोधनाची गरज आहे. केवळ नापास करून शिक्षणाची गुणवत्ता उंचावत असेल, तर तसा निर्णय घ्यायला हवा. मात्र, तशा स्वरूपाचे कोणतेच संशोधन नसेल, तर त्याबद्दलही विचार करायला हवा. विद्यार्थी नापास केल्यावर अभ्यास करतात, अशी विधाने सार्वत्रिक स्वरूपात उपयोगात आणली जातात. मात्र, खरेच असे काही घडते का ? असे कोणतेही संशोधन हाती नाही. मात्र, हे निरीक्षण म्हणून पुढे आणले जाते. त्यामुळे याबद्दलही सूक्ष्मतेने विचार करण्याची नितांत गरज आहे. मात्र, शाळेत नापास होणारे अनेक विद्यार्थी जीवनात मात्र यशस्वी झालेले भोवतालमध्ये दिसत आहेत.
शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर देशातील प्राथमिक शिक्षणातील गळतीच्या प्रमाणात घट झाली आहे. आपल्या राज्यातील परिस्थिती या संदर्भाने चांगली असल्याचे चित्र आहे. त्याचवेळी स्थगितीचा प्रश्न सुटला आहे. तरी मुले नापास का होतात ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक मुलांशी बोलल्यानंतर त्याची अनेक कारणे पुढे आली आहेत. त्यात पालकांच्या अपेक्षांचे ओझे आणि त्यातून निर्माण होणारे ताणतणाव हे मुख्य कारण असल्याचे अनेक पाल्य सांगतात. सतत वर्गात बसून माहितीचा सातत्याने होणारा मारा. एकसुरी अध्यापनाची प्रक्रिया. शाळेत विद्यार्थी जेव्हा येतो तेव्हा त्याच्या शिक्षणात पंचज्ञान इंद्रियाचा उपयोग होण्याची गरज आहे. मात्र, आपल्याकडे शिक्षण होत असताना अधिकाधिक उपयोग केवळ कानांचा करत असल्याचे वास्तव आपल्या समोर आहे. शरीराच्या इतर अवयवांचा शिक्षणात फारसा उपयोग होत नाही. शाळेत मुलांच्या शक्तीचा फारच कमी वापर होतो. बुद्धीचा वापर कमी तसा कौशल्यांचा आणि क्षमतांचा देखील वापर होताना दिसत नाही. जगताना जे गरजेचे आहे त्या वास्तवात विचार होताना दिसत नाही. शाळेतील भाषेचा बालकाच्या घरच्या आणि जगण्यासाठी लागणार्या भाषेशी संबंध नाही. शाळेतील माहितीचे जगण्याच्या वास्तवाशी कोणताही संबंध उरलेला दिसत नाही. या सारख्या काही कारणाचा विचार समोर येतो.
नापास मुले पुढे जीवनात अपयशी होतात का ? त्यांना जगण्यात शिक्षणाच्या अभावामुळे अडचणी येतात काय? या प्रश्नांच्या मुळाशी जावून शोध घेतला, तर फार अडचणी येतात असे होत नाही. उलट ही मुले जीवनात यशस्वी होताना दिसतात, तर मग शाळेत अपयशी शिक्का का मारला जातो? शाळेत येणार्या अपयशाला तीच मुले जबाबदार तर नाही ना ? असा प्रश्न पडतो. किंबहुना ही मुले जेव्हा नापास होतात. तेव्हा त्यामागे शाळा जबाबदार नाहीत असेही म्हटले जाते. या प्रक्रियेला केवळ मुलेच जबाबदार आहेत, असे मानणारा एक वर्ग आहे. या प्रक्रियेस मुले जबाबदार नाहीत, असे म्हणणार्या शाळा तर अपवादाने सापडतील. शाळेत मुले जेव्हा नापास होतात तेव्हा त्यास शिक्षक, शाळा आणि तेथे सुरू असणारे उपक्रम जबाबदार आहेत, असे मानण्याची गरज वाटत नाही काय ? अर्थात काही प्रमाणात मुले आणि पालकही जबाबदार आहेत हेही नाकारता येणार नाही. ज्या मुलांना शिक्षणांत अपेक्षित क्षमता प्राप्त करता आलेल्या नाहीत. त्याचे कारण मुलांची मानसिक क्षमता. त्या मुलांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती जबाबदार आहे, अशी कारणे पुढे येतात.
नापास मुलांची गोष्ट
शैक्षणिकदृष्ट्या नापास झालेली मुले अनेक ठिकाणी प्रचंड यशस्वी झालेली आहेत, अशी अनेक उदाहरणे आहेत. पालक वर्ग देखील विद्यार्थ्यांचे नापास होणे किंवा अपयश येणे या गोष्टी सकारात्मकतेने समजावून घेत होते. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील नापास विद्यार्थ्यांची यशोगाथा वाचली, की आश्चर्यकारक धक्का बसतो. शालेय स्तरावर फारशी आवड नसलेला विद्यार्थी जीवनाच्या शाळेत तोंडात बोट घालायला लावताना दिसतात. त्यापैकीच हा एक विद्यार्थी होता. शाळेत फारसा हुशार नव्हता. इंग्रजी ही त्याला फारशी चांगली येत नव्हती. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या फारशी समाधानकारक नव्हती. एक टपरीवर व्यवसाय करणार्या पालकाचा हा मुलगा शाळेत फार रमला नाही. शाळेच्या वेळेत चित्रपट पाहाण्याकरता सायकलवरती पन्नास ते साठ किलोमीटर अंतर कापत जाणारा हा विद्यार्थी होता. त्याचा परिणाम म्हणून त्या राज्याची शालांत परीक्षा नापास होणे नशिबात आले. मग काय घरच्या मंडळींनी पुढच्या शिक्षणाला विरोध करीत धंदा करा असे सुनावले. या अपयशाची त्याला जाणीव होऊ लागली होती. त्यामुळे आपण पुन्हा परीक्षा देऊन यश मिळवावे असे वाटू लागले. पालक परवानगी देण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्याने आपल्या वडिलांच्या मित्रांना विनंती करत पुन्हा एकदा परीक्षेला बसण्याकरता पालकांची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नाला यश मिळाले, पालकांची अनुमती मिळाली. आपल्याला ज्या विषयांमध्ये गती नाही अशा विषयांचा शोध घेतला गेला आणि मग त्यातील अपयशातील कारणाचा शोध सुरू झाला. संबंधित शिक्षकांशी बोलणे केले, त्यांच्याकडून समजून घेण्याचा प्रयत्न झाला आणि जिद्दीने पुन्हा अभ्यास सुरू केला. या सर्व प्रकारांत पुनर्परीक्षेत हा विद्यार्थी सुमारे 85 टक्के गुण मिळवत आंध्रप्रदेशात पहिला आला. यश प्रचंड होते; पण पुढे नापास झाला म्हणून नामवंत महाविद्यालयांनी प्रवेश नाकारला. ज्या महाविद्यालयात प्रवेश मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घेत यशाचे शिखर पादाक्रांत करण्याचा प्रयत्न सुरू झाला. अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. नोकरीचा शोध सुरू झाला. जो विद्यार्थी नापास झाला होता, तेव्हापासून तो नोकरीत रमण्याची शक्यता अजिबातच नव्हती. त्यामुळे केवळ दोन महिने नोकरी करीत राजीनामा दिला गेला. परराज्यातील एक बंद पडलेला साखर कारखाना विकत घेतला. तो संपूर्ण खोलखाल करत स्वतःच्या राज्यात त्याची उभारणी केली गेली आणि यशस्वीरित्या सुरू देखील केला. शाळेत गणित न जमणारा. भाषेचे आकलन नसलेला. शिक्षणातील गुणाचे शास्त्र न जाणणारा हा विद्यार्थी व्यवहारिक जीवनात मात्र बँकिंग, विमा, उर्जा, रस्ते, विमानतळ, स्थावर मालमत्ता या सारख्या अनेक क्षेत्रांत स्वतःच्या नावाचा ठसा उमटवणारा ठरला. या तरूणांचे नाव आहे मल्ली बाबू उर्फ जी.ए.राव अर्थात जगप्रसिद्ध जी.एम.आर ग्रुपचे प्रमुख. आज आंतरराष्ट्रीय किर्तीचा हा समूह उभा राहिला आहे. कोट्यवधी रूपयांचा हा व्यवसाय यशाचा शिखरावर गेला आहे. त्याचे कारण शिक्षणात दडले आहे काय?
असा प्रश्न पडतो.
ही तर धावण्याची स्पर्धा!
खरेतर मुले यश अपयशी होतात तेव्हा त्या अपयशातूनही खूप काही शिकत असतात. प्रत्येकवेळी ती यशस्वीच झाली पाहिजेत, यश मिळविण्याकरिता त्यांनी जीवाचा आटापीटा करायला हवा, असा आग्रह पालक करीत असतात. या आग्रहातून मुले अनेकदा वाम मार्गाने यश मिळवत असतात. त्यातून अपेक्षित नसलेले संस्कार होतात. कधी कधी हीच मुले ताणतणावात येतात. त्यातून जगण्याचा आनंदच हरवून बसतात. निराशा घर करून राहते. त्यामुळे शाळा आणि पालकांनी शाळेच्या मार्कावर मुलांच्या जीवनाचे यश अपयश म्हणजे जीवनाचे यश अपयश मानता कामा नये. शाळेत अनेकदा भिंतीवर सुविचार लिहिलेले असतात. हजारोवेळा ती वाचली जातात. शिक्षकही सांगतात, की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे; पण हा केवळ सुविचारच राहतो. त्या सुविचाराचे रूपांतर जगण्याच्या वर्तनात प्रतिबिंबीत होताना दिसत नाही. त्यामुळे शाळेतील शिक्षणात यश अपयशाची पायाभरणी होण्यापेक्षा सकारात्मकतेची पायाभरणी अधिक महत्त्वाची वाटते. प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जावून विचार करण्याची क्षमता विकसित करणे महत्वाचे आहे. आजच्या स्पर्धेच्या नावाखाली जे काही सुरू आहे ते शिक्षण नाही, तर केवळ धावण्याची स्पर्धा आहे. त्यातून मुलांना बाल्यावस्थेतून आपण गतीने प्रौढ बनवत तर नाही ना ? असा प्रश्न पडतो. परवा एक पालक म्हणत होते, की तिसरीला त्यांची मुलगी शिकते आहे. सध्या विविध स्पर्धा परीक्षांचा आणि त्यातही खाजगी संस्थांच्या परीक्षांचा शिक्षणात धुमाकूळ सुरू आहे.त्या परीक्षांचा सराव शाळा स्तरावर घेतला जातो. तिने लिहिलेल्या परीक्षेचा पेपरवर नाव व क्रमांक टाकला नव्हते. अशी चार-पाच मुले होती. मग तिला जे मार्क सांगण्यात आले ते दुसर्याच विद्यार्थ्याचे. या घटनेने मुलगी रडत घरी गेली. घरी जेवली नाही. तिला पालकांनी समजावून सांगूनही ती अस्वस्थ होती. तिची निराशा लपून राहिली नव्हती. काय करावे कळत नव्हते. खरेतर इतक्या लहान वयात यश अपयशाचा परिणाम मुलांच्या गळ्याशी उतरणे हे घातक वाटते. ते पालकही अस्वस्थ होते. शाळांनी व पालकांनी अशी जीवघेणी आणि नैराश्य पेरणारी स्पर्धा उभी करणे खरच आवश्यक आहे काय? असा प्रश्न आहे. खरेतर शिक्षण ही व्यक्तीचे जीवन उभी करणारी शाळा असायला हवी. सध्या अशा स्वरूपाची प्रक्रिया करण्यात वर्तमानातील शिक्षण हे कुचकामी ठरत आहे. अशा परिस्थितीत अपयश पचविणे आणि ते समजावून घेणे महत्वाचे आहे. कोणतेही अपयश हे जीवनाचे नसते. नव्या उमेदीने पुन्हा उभे राहत प्रगती करता येते, हे राव यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे सध्या शिक्षणात पास नापासाभोवती फिरणार्या चर्चेत या बाजू, भूमिका समाजवून घेण्याची गरज आहे.
शिक्षण म्हणजे परीक्षेतील यश नाही, तर जीवनासाठीची सक्षमता देते ते खरे शिक्षण असते. त्यामुळे शाळांमध्ये पास, नापास केले तर किती मुले आपल्याला हवे असलेले मार्क मिळवतील माहीत नाही. मात्र, ही अपयशी मुले जीवनात मात्र यशाचे शिखर गाठताना दिसत आहे. त्यामुळे शिक्षणाने यश आणि अपयश संकल्पनेचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. नापास मुलांची गोष्ट समजावून घेतली तर त्यांच्या नापास होण्याला कोण जबाबदार आहे याचा विचार करण्याची गरज आहे.
Related
Articles
गुंतवणूक क्षेत्रातील पितामह चार्ली मुंगेर
30 Nov 2023
ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको : नारायण राणे
01 Dec 2023
तुषार दोशी यांची पुन्हा बदली
25 Nov 2023
भ्रष्टाचार प्रकरणी इम्रान यांची दोन तास चौकशी
27 Nov 2023
पंजाबी गायकाच्या हत्येचे कारस्थान दिल्लीत उधळले
27 Nov 2023
लोकसभा स्वबळावर लढणार : मायावती
01 Dec 2023
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
गुणवत्तावाढीसाठी निपुण भारत अभियान
2
पुस्तकं वाचायला हवी...
3
अशी अनास्था काय कामाची?
4
दबावाची खेळी? (अग्रलेख)
5
गृहमंत्र्यांना घरचा रस्ता !
6
वाचक लिहितात